जिल्हयातील हॉटेल, रेस्टॉरंटची होणार झाडाझडती

अन्न व औषध विभाग अलर्ट मोडवर
पेण | प्रतिनिधी |
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण थर्टी फस्ट साजरा करण्यासाठी हॉटेल, रेस्टॉरंटची वाट पकडतात. वाढती गर्दी आणि एकाच दिवशी बक्कळ कमाई करण्याच्या नादात हॉटेल, रेस्टॉरंट चालक भेसळ तर करणार नाहीत ना? याची खातरजमा करण्यासाठी जिल्हयात 20 डिसेंबरपासून तपासणी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये अनुचित प्रकार आढळल्यास स्टॉप सेलची कारवाई होणार असल्याची माहिती अन्न विभागाने दिली आहे.
डिसेंबरचा शेवटचा आठवडा म्हणजे सेलिब्रेशनचा आठवडा. यामध्ये ख्रिसमस (नाताळ) आणि थर्टी फस्ट अनेकजण साजरे करतात. परंतु ग्राहकांना देण्यात येणारे अन्न हे भेसळयुक्त तर नाही ना? याबाबत हॉटेल्स मालकांनी काय खबरदारी घेतली आहे, याची तपासणी करण्यासाठी अन्न विभागातून येत्या 20 डिसेंबरपासून विशेष तपासणी मोहिम राबविली जाणार आहे. काही त्रुटी आढळल्यास त्या हॉटेल मालकांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच हॉटेल संचालकांना कोरोनाविषयक नियमांचेही पालन करावे लागणार आहे.
हॉटेलमालकांनी ही घ्यावी काळजी
अन्न विभागाकडून वेळोवेळी हॉटेल मालकांना सूचना केल्या जातात. त्यानुसार अन्न तयार करणार्‍यांनी डोक्यावर अ‍ॅप्रॉन कॅप घालावी. आस्थापनेच्या ठिकाणी स्वच्छता राखावी, कामगारांनी वैयक्तिक स्वच्छता ठेवावी, किचनमध्ये स्वच्छता ठेवावी, अन्न पदार्थ बनविताना उच्च दर्जाचे कच्चे अन्न वापरावे ही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अशी होऊ शकते कारवाई
20 डिसेंबरपासून सुरू होणार्‍या तपासणी मोहिमेत दोन अन्न सुरक्षा अधिकारी सहभागी होणार आहेत. ते जिल्हयातील 953 हॉटेल्सची तपासणी करणार आहेत. विशेष म्हणजे यामध्ये काही त्रुटी आढळल्यास आधी त्या मालकाला नोटीस देऊन नंतर त्याच्यावर स्टॉप सेलची कारवाई केली जाणार आहे.

Exit mobile version