हॉटेल्स-रेस्टाॅरंट्स मध्यरात्रीपर्यंत राहणार सुरु

जिल्हाधिकार्‍यांनी निर्बंधात दिली सवलत, जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायिकांना दिलासा
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
रत्नागिरी जिल्हयात कोरोना रूग्णसंख्या घटत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा हॉटेल असोसिऐशनच्या विनंतीचा विचार करून जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी रत्नागिरी जिल्हयातील सर्व रेस्टॉरंट व उपहारगृहे ही दररोज रात्री 12 वाजेपर्यत 50 क्षमतेनेच सुरू ठेवण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. कोरोना निर्बंधाच्या काळात रत्नागिरी जिल्हयातील रेस्टॉरंटस व उपहारगृहे दररोज रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहतील असे आदेश देण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिऐशन यांनी जिल्हाधिकारी डॉ बी. एन. पाटील यांची भेट घेतली होती व आपले म्हणणे मांडले होते. त्यामध्ये नव्याने सुरू होणारी पर्यटन स्थळे, शाळा, व्यापार यांचा विचार करता हॉटेलसाठी रात्री 10 पर्यंतची वेळ ही गैरसोयीची ठरत होती.

सर्वसाधारणपणे हॉटेलमध्ये येणारे ग्राहक हे रात्री नऊ वाजल्यानंतर हॉटेलमध्ये यायला सुरूवात होते. मात्र, 10 नंतर सुरू होणार्‍या पोलीस बंदोबस्ताला घाबरून सध्या हॉटेलमध्ये येणे ग्राहक टाळत होते. यामुळे आमच्या व्यवसायावर याचा विपरीत परिणाम होत आहे. हॉटेल व्यावसायिकांना त्याचा आर्थिक फटका बसत आहे . तसेच ग्राहकांची देखील गैरसोय होत आहे.रत्नागिरी जिल्हयातील हॉटेल्स रात्री बंद करण्याची वेळ ही रात्री 11 नंतरची केली जावी अशी विनंती केली होती.

अलीकडे कमी होत असलेली कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी या निर्बंधात शिथिलता दिली आहे. रत्नागिरी जिल्हयातील सर्व रेस्टॉरंट व उपहारगृहे ही दररोज रात्री 12 वाजेपर्यत 50 क्षमतेनेच सुरू ठेवण्याची सशर्त परवानगी त्यांनी दिली आहे. रत्नागिरी जिल्हयातील सर्व रेस्टॉरंटस् आणि उपहारगृहाच्या ठिकाणी अभ्यागतांच्या माहितीसाठी अशा आस्थापनांच्या बाहेर दर्शनी ठिकाणावर एकूण क्षमता आणि सध्याची अभ्यागतांची संख्या दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक राहील, दररोज घरपोच सेवेस परवानगी राहील असेही आदेशात म्हटले आहे.

Exit mobile version