चाळीस ठिकाणी चोर्या
| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोली परिसरात घडलेल्या विविध घरफोड्यांप्रकरणी रायगड पोलिसांनी सराईत घरफोड्यास अटक केली आहे. त्याने ठिकठिकाणी चाळीस घरफोड्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. वरची खोपोलीत जानेवारीमध्ये चार ठिकाणी घरफोड्या झाल्या होत्या. त्यानंतर पंधरा दिवसात सुमारे नऊ चोर्यांच्या घटना घडल्या होत्या. चोरट्यांकडे धारधार लांब कोयते असल्याचे सीसीटिव्ही फुटेजमध्ये निदर्शनास आल्यामुळे कोयता गँगच्या अफवेमुळे खोपोलीतील रहिवाशी भयभीत झाले होते. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविली होती.
खोपोली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश कदम व पोलीस स्टाफचा विशेष पोलीस पथक तयार केले होते. पोलिसांनी तपास करुन आरोपाला पकडले. त्याच्याकडून 1 लाख 26 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.
कन्वरसिंग काळूसिंग टाक, वय-30 वर्षे, रा. हडपसर असे आरोपीचे नाव आहे. अजूनही त्याचे दोन साथीदार आहेत. निहसलसिंग मनुसिंग सक, विधीसंघर्षीत बालक नामें सोनूसिंग भौड हे दोघे गुन्हा घडल्यापासून फरारी झालेले आहेत. या चोरट्याला पकडणार्या पथकात सहा. पोलीस निरीक्षक राकेश कदम, अलोक खिसमराव, प्रविण भालेराव, प्रदीप खरात, सागर पडधान, संतोष भोये, दत्तात्रेय नुलके, स्वागत तांबे यांचे विशेष प्रयत्नांतून केल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणला. कोयता गँगचा खोपोली शहरात हैदोस असल्याच्या खोटया अफवांमुळे नागरिक भयभित झाले होते. मात्र प्रत्यक्ष ते सराईत चोर आहेत. चोरट्यांनी चोरल्याला वस्तू चोरी झालेल्या नागरिकांना सन्मानपूर्वक देणार आहोत, असे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी सांगितले.