लाखोचे नुकसान, सुदैवाने जिवीतहानी टळली
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग शहरातील शिवलकर नाका येथील एका घराला आग लागली. या आगीत स्वयंपाक घरातील साहित्यांसह अन्य वस्तू जळून खाक झाल्या. या आगीत लाखोची हानी झाली. नगरपरिषद व आरसीएफ कंपनीच्या अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.11) सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एका रिक्षा चालकाने ॲड. अशिष रानडे यांना फोन करून घराच्या शेजारी आग लागल्याची माहिती दिली. ही बाब अशिष रानडे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांची काकी संजीवनी रानडे यांचे घर गाठले. त्या घाबरल्या होत्या. अशिष रानडे, अनिल चोपडा, अमोल हजारे, संदीप रानडे, उस्मान सय्यद, राजेश आसरानी, समीर पवार, दिलीप रानडे यांनी संजीवनी रानडे यांना सुरक्षीत घरातून बाहेर काढले. दरम्यान स्थानिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, आगीचा भडका वाढतच राहिला. अखेर अलिबाग नगरपरिषदेच्या अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांच्याकडून देखील आग आटोक्यात येत नव्हती. अखेर आरसीएफ कंपनीच्या अग्नीशमन दलाला बोलावण्यात आले. नगरपरिषद व आरसीएफ अग्नीशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. तब्बल दोन अडीच तासानंतर आग आटोक्यात आणण्यात या यंत्रणेला यश आले. या आगीत सुदैवाने जिवीतहानी टळली. मात्र, मोठ्या प्रमाणात वित्त्तहानी झाली. स्वयंपाक घरासह हॉलमधील परिसर जळून खाक झाला. या आगीत रानडे यांचे प्रचंड नुकसान झाले.
सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
आगीचा भडका प्रचंड होता. स्वयंपाक गृहात असलेली सिलेंडरची टाकी तापली होती. त्यामुळे टाकीला भगदाड पडले होते. शिवलकर नाका परिसरात लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. सुदैवाने सिलेंडरचा स्फोट झाला नाही. त्यामुळे अनेकजण बाल बाल बचावल्याचे बोलले जात आहे.
