| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
पंचशील नगर झोपडपट्टी नवीन पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या बंद घरात सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली. काही वेळातच ही आग पसरली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अनेक दुचाकींचे नुकसान झाले.
गुरुवार, दि. 11 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास पंचशीलनगर झोपडपट्टी रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या बंद घराला आग लागली. सिलिंडरचा स्फोट होऊन ही आग लागली असल्याचे बोलले जात आहे. या आगीत हाय व्होल्टेजची एक चालू लाईन तुटून घरावर पडली. तर, महावितरणची लाईन तुटून पडल्याने घराला आग लागली असल्याचे काही जण सांगत आहेत. त्यानंतर मोठ्या प्रमाणात आग भडकली. यावेळी नवीन पनवेल अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ही लाईन बंद केली. या आगीमध्ये घराच्या मागच्या बाजूला असलेल्या दुचाकी पार्किंगमधील जवळपास दहा ते बारा वाहनांचे नुकसान झाले. अग्निशामक दलाने काही तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवले. दोन जेसीबीच्या सहाय्याने विझवलेले साहित्य बाजूला करण्यात आले. मात्र, या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नवीन पनवेल परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.
सिलिंडरचा स्फोट; बंद घराला आग
