| हिमाचल प्रदेश | वृत्तसंस्था |
हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली. चुरा उपविभागातील जांगरा ग्रामपंचायतीच्या शावा गावात एका लग्न समारंभा दरम्यान मातीचं घर अचानक कोसळलं, ज्यामध्ये 20 ते 25 महिला जखमी झाल्या. सर्व जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून तीसा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी (दि. 6 ) दुपारी दोन वाजता घडली आणि त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे.
घटनेच्या वेळी महिला पारंपारिक लग्नाच्या नृत्यात सहभागी झाल्या होत्या. पाहुणे आले होते. अचानक मातीच्या घराचा एक खांब तुटला, ज्यामुळे संपूर्ण छत कोसळलं, महिला गाडल्या गेल्या आणि अनेक जण गंभीर जखमी झाले. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये महिला नाचत असल्याचं दिसून आलं आहे. कोसळल्यानंतर आरडाओरडा सुरू झाला आणि स्थानिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केलं. दुर्घटनेनंतर काही मिनिटांतच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि सर्व जखमींना तीसा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. रुग्णालय प्रशासनाने सांगितलं की जखमींवर उपचार सुरू आहेत. स्थानिक रहिवाशांच्या तत्परतेमुळे अडकलेल्यांना तातडीने वाचवण्यात आलं. आतापर्यंत कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे.







