सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून धुवाधार पाऊस कोसळत आहे. अतिवृष्टीने अनेक ठिकाणी दरड व घरे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच पेण तालुक्यातील बेणसे येथील यमुनाबाई घासे यांचे घर सोसाट्याचा वादळवारा व मुसळधार पावसामुळे कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घराचे मोठे नुकसान झाले आहे.
काही दिवस अतिमुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. शिहू बेणसे विभागातदेखील दिवसरात्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच बेणसे येथील यमुनाबाई घासे यांचे घर कोसळले. यावेळी त्यांच्या घरात वास्तव्यास असलेले काशिनाथ सुतार यांचे कुटुंब थोडक्यात बचावले. मात्र, या दुर्घटनेत घराची कौले फुटून तसेच घरगुती साहित्याची मोडतोड होऊन मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, शासनाने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी, अशी मागणी सुतार कुटुंबीयांनी केली आहे.







