सिडको अग्निशमन दलाची तत्पर कारवाई
| पनवेल । प्रतिनिधी ।
खारघर-तळोजा जेल रोडवरील खुंटारी गावाजवळील तलाव परिसरात नंदकुमार चंद्रकांत म्हात्रे यांच्या जी+२ इमारतीतील पहिल्या मजल्यावरील घराला आग लागली. ही घटना मंगळवारी (दि.24) रात्री घडली. आगीची माहिती मिळताच सिडको अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशमन दलाने एका होज लाईनच्या साहाय्याने घराच्या आत आणि बाहेरून पाण्याचा जोरदार मारा करत आग पूर्णपणे आटोक्यात आणली. आग विझवल्यानंतर जळालेल्या कपाटातून काही मौल्यवान दागिने, रोख रक्कम व इतर साहित्य सुरक्षित बाहेर काढून घरमालकांच्या स्वाधीन करण्यात आले. तसेच किचनमधील चार एलपीजी सिलेंडरही सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले.
या आगीत घरातील कपाट, एसी, बेड, सोफा व इतर साहित्य जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही दागिने तसेच अंदाजे एक ते दीड लाख रुपयांची रोख रक्कम जळाल्याचे घरमालकांनी सांगितले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घरातील रहिवासी लीना नंदकुमार म्हात्रे या पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका आहेत.
या कारवाईत अग्निशमन प्रणेता पी. के. दरेकर, यंत्रचालक एस. डी. निघुट तसेच फायरमन अजय वाघ, कैलास शिरसाठ, गणेश भोईर, जी. पी. गडगे, ए. एस. पाटील आणि गणेश सवर यांनी सहभाग होता.






