। माणगाव । प्रतिनिधी ।
घराला लागलेल्या भीषण आगीत लाखोंचे नुकसान झाल्याची घटना माणगाव तालुक्यातील हरवंडी गावात मंगळवारी (दि. 2) सायंकाळच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, हरवंडी गावातील परशुराम मानकर यांच्या घराला मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. या भीषण आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले असून, अंदाजे लाखोंचे आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागल्याची माहिती मिळताच हारवंडी ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. यामध्ये ग्रामीण वस्ती सेवा एस.टी. कर्मचारी अशोक आगाव आणि संभाजी कोंडे यांनी धाडसाने पुढाकार घेऊन आग विझविण्यात मोलाचे योगदान दिले. दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून स्थानिक प्रशासनाकडून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे. गावकऱ्यांच्या मदतीमुळे आणि सतर्क नागरिकांच्या प्रयत्नांमुळे मोठी आपत्ती टळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.







