| पुणे | प्रतिनिधी |
आंबेगाव तालुक्यातील जवळे येथील गावठाणातील भरत कुशाबा गावडे यांच्या राहत्या घरी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची गळती होऊन आग लागली. ही घटना बुधवारी (दि. 13) 8 वाजण्याच्या सुमारास घडली असून यात संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या.
जवळे गावठाण येथे भरत कुशाबा गावडे हे आपल्या पत्नी अनिता आणि मुलगा अनिल यांच्या समवेत राहतात. बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गॅस गळतीमुळे घराला आग लागल्याचे लक्षात येताच घरातील हे तिघेही जण घराच्या बाहेर पळाले. यावेळी गावातील सर्व तरुणवर्गाने आग आटोक्यात आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. वीज प्रवाह बंद करून पाण्याच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंच वृषाली शिंदे यांनी घटनेची माहिती तहसीलदार संजय नागटिळक यांना फोनवरून दिली असता तलाठी विश्वनाथ मुगदाळे यांनी घटनेचा पंचनामा केला. तसेच, अष्टविनायक गॅस एजन्सी नारायणगाव याठिकाणाहून गॅस सिलिंडरची गळती कशामुळे झाली, हे पाहण्यासाठी अधिकारीही आले होते. या आगीत घरातील टीव्ही, फॅन, मिक्सर, मोबाईल, सर्व भांडी, डबे, देवांच्या मूर्ती, धान्य, कपडे, घराच्या सर्व भागातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. यामध्ये अंदाजे 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे भरत गावडे सांगितले.







