| खेड | प्रतिनिधी |
खेड तालुक्यातील कातळआळी, वाणीपेठ येथे आज (दि. 12) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घराला आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये घरातील किचनमधील फ्रिज जळून खाक झाले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
किशोर विचारे यांच्या दोन मजली कौलारू घरातील किचनमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. घरात ठेवलेले तीन गॅस सिलिंडर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळेवर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. आगीची माहिती मिळताच खेड नगरपरिषद अग्निशमन दलाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या प्रयत्न करून आग पूर्णपणे आटोक्यात आणली. नगरपरिषद अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अपघात टळला असून, रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.






