आ.जयंत पाटील यांना निवेदन सादर
। रसायनी । वार्ताहर ।
रसायनी परिसरात गरजेपोटी बांधलेली घरे कायमस्वरुपी व्हावी, याकरीता नागरिकांनी शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांना निवेदन दिले. यावेळी घरे नावावर होण्यासाठी विधिमंडळात आवाज उठविला जाईल,अशी ग्वाही आ.जयंत पाटील यांनी ग्रामस्थांना दिली आहे.
रसायनी परिसरातील घरांच्या मुद्यावरुन शेकापचे जिल्हा चिटणीस मंडळ सदस्या समीर विष्णू म्हात्रे यांनी नुकतीच जयंत पाटील यांची भेट घेऊन गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या प्रश्नावर चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेत रसायनी परिसरातील अनेक गावच्या जमिनी जवळपास 1600 एकर शासनाच्या एचओसीने घेऊन त्यातील काही जमीन एमआयडीसीला वर्गं केली. यातच मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील लोकसंख्या पाहता साठ हजारांपेक्षा जास्त आहे. वाढती लोकसंख्येचा विचार करता जागेअभावी येथील नागरिकांनी गरजेपोटी घरे बांधलेली आहे. अशी घरे बांधण्यासाठी त्यांनी दागदागिने गहाण ठेवून व कर्ज घेवून सदरची घरे बांधण्यात आलेली अशी माहिती समीर म्हात्रे यानी चर्चेच्या वेळी दिली.
वावेघर, खाने अंबिवली, आळी आंबिवली, मोहोपाडा (पंचशील नगर), नवीन पोसरी, शिवनगर या ठिकाणी गरजेपोटी बांधलेली घरे ही त्यांच्या नावे कायमस्वरूपी करावीत अशी मागणी समीर म्हात्रे यांनी केली. यावर विधिमंडलात हा मुद्दा उपस्थित करुन सरकारचे लक्ष वेधले जाईल, अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली.
यावेळी रसायनी परिसरातील दर्शंन रामचंद्र पाटील, रुपेश बाबू खारकर, अविनाश भोईर आदी उपस्थित होते.