। पेण । प्रतिनिधी ।
पेण शहरातील पीरडोंगरी व फणसडोंगरी या परिसरामध्ये अनधिकृतरित्या अनेकजणांनी घरे बांधलेली आहेत. ही घरे पूर्णतः डोंगर उतारावर असल्याने या घरांवर पावसाळ्यात केव्हाही डोंगर कोसळू शकतो,अशी भीती व्यक्त केली जाते आहे.
रायगडात गेल्या वर्षी हाड तालुक्यातील तळीये या परिसरात झाला तोच प्रकार अतिवृष्टीमुळे पीरडोंगरी व फणसडोंगरी या विभागात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चार दिवसांपूर्वी ( 13 जुलै ) सायंकाळी पीरडोंगरीवरील संतोष शेडगे यांच्या घरासमोरील संरक्षण भिंत खचून भास्कर झोरे व हिरामण मोरे यांच्या घरांच्या मागच्या बाजूला पडली. त्यामुळे येथील तीन कुटुंबियांना तातडीने तेथून स्थलांतरीत करावे लागले. तसेच संतोष शेडगे यांच्या घरासमोरील जी भिंत खचली आहे. त्या ठिकाणाहून पावसाचे पाणी आत शिरल्यास डोंगर उताराची माती सरकून भुस्खनन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या ठिकाणाहून संरक्षण भिंत खचली आहे. त्या ठिकाणातील मातीचे परीक्षण करणे गरजेचे आहे.
या डोंगर उतारावर एका घराला धोका जरी पोहचला तर बाकीच्या इतर घरांनाही धोका होऊ शकतो. जर वेळीच यावर काही उपाय योजले नाहीत तर भीमाशंकर जवळील असलेल्या माळीण गावांसारखी परिस्थिती या भागात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पीर डोंगरी व फणस डोंगरी भागात असलेल्या रहिवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने उपाययोजना करावी अन्यथा वित्तहानी बरोबर जीवितहानी झाल्याशिवाय राहणार नाही.अशी भीतीही रहिवाशांमधून व्यक्त केली जात आहे.
या दोन्ही डोंगरावर अनधिकृतरित्या घरे बांधली आहेत. या अनधिकृत बांधकामाला प्रशासनाकडून कोणतीच परवानगी दिली नाही. या रहिवाशांना वारंवार सतर्कतेचा इशारा नगरपालिकेकडून दिला जातो. परंतु, येथील रहिवासी या बाबीकडे दुर्लक्ष करतात. डोंगरीवरील बांधकाम हे पूर्णतः डोंगर उतारावर असल्याने भूस्खलन होऊन घरे कोलमडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. दुर्दैवाने काही अनुचित प्रकार घडला तर याला पूर्णतः जबाबदार हे येथील रहिवाशीच असतील.
जीवन पाटील, मुख्याधिकारी,पेण