महागाईमुळे गृहिणींना मिरचीचा ठसका

मसाल्याचे पदार्थ खरेदीसाठी बाजारात गर्दी

| नेरळ | प्रतिनिधी |

रुचकर आणि चविष्ट मसाले बनवून मिळविण्यासाठी कर्जत आणि नेरळच्या बाजारपेठेत मिळणारी मिरची महत्त्वाची भूमिका बजावत असते. हैद्राबादची स्पेशल मिरची मिळणारी एकमेव बाजारपेठ म्हणून कर्जत येथील बाजारपेठ गृहिणींच्या गर्दीने फुलली आहे. महागाईच्या जमान्यात दुकाने कमी झाली असली तरी आवक मात्र तेवढीच आहे. त्यामुळे मिरचीचा ठसका जेवणाच्या मसाल्यात हवा तर मिरची गल्लीत जायलाच हवे. पण, यावर्षी महागाईमुळे मिरचीचा ठसका गृहिणींचा खिसा खाली करणारा नक्कीच आहे.

उन्हाळ्याला सुरुवात झाली की गृहिणींना वेध लागतात ते पावसाळ्यात लागणार्‍या वस्तुंची साठवण करण्याचे. सुगरण असलेल्या महिला मंडळीला लवकरात लवकर तिखट मसाले तसेच अन्य मसाले बनवून ठेवण्याचे वेध लागले असतात. जेवणातील कोणत्याही प्रकारच्या पदार्थामधील महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे त्यात वापरले जाणारे मसाल्याचे पदार्थ. विशेष प्रकारचे पदार्थ बनविण्यासाठी लागणारे मसाले हे उत्तम दर्जाच्या मसाल्याचे साहित्य वापरून तयार केलेलं असावेत, अशी सर्वसाधारण अपेक्षा गृहिणीची असते. त्यामुळे मसाल्याचे पदार्थ बनविण्यासाठी गृहिणी स्वतः जातीने लक्ष देत असतात. त्यासाठी आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिरचीसाठी कर्जतची बाजारपेठ सर्वांना हक्काची आणि खात्रीची वाटत आली आहे.

महाराष्ट्रातील मिरचीची सर्वात मोठी बाजारपेठ कर्जतच्या मिरची बाजारपेठेची ओळख आहे. कर्जतच्या बाजारपेठेत विकली जाणारी मिरची ही प्रामुख्याने तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातून येते. या मिरची गल्लीत जेवणात तिखट मसाल्याचे विशेष आकर्षण असलेले खवय्ये प्रामुख्याने मिरची खरेदीसाठी आवर्जून येत असतात. मुंबई मधील हौशी खवय्ये त्याचप्रमाणे बदलापुर, डोंबिवली, कल्याण, पनवेल, ठाणे, नवी मुंबई या भागातील आगरी-कोळी लोक मच्छी-मटण या पदार्थांची लज्जत वाढविणारे मसाले बनविण्यासाठी कर्जतची बाजारपेठ मध्ये येवून वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या खरेदी करण्यासाठी जानेवारीपासून गर्दी करू लागले आहेत. तिखट मिरची सोबत मसाल्याचे पदार्थ त्यात हळद, गरम मसाले यांची खरेदी मोठ्या प्रमाणात कर्जत शहरातील महावीर पेठेतील दुकानांमधून सुरू आहे.

कसा करतात मसाला?
खरेदी केलेल्या मिरचीची सुकलेली देठ काढून मिरची कडक उन्हात सुकवली जाते. त्यानंतर त्यात हळद, गरम मसाले यांचे योग्य मिश्रण करून या सर्व वस्तू मिरची कांडपमध्ये मसाला तयार करण्यासाठी नेल्या जातात. तेथे कांडप गिरणीत तयार झालेला मसाला गृहिणी या डब्बे भरून ठेवतात. हा मसाला वर्षभर टिकतो, तर बाजारात मिळणारे तिखट मसाल्याच्या पाकिटात केवळ मिरची पूड असते. त्यामुळे मिरची खरेदी करून कांडप केंद्र शोधून मसाले तयार करण्यासाठी महिला धडपड करीत असतात.

यंदा मिरची गेल्या वर्षी पेक्षा महाग झाली आहे हे खरे असले तरी महागाई, तसेच वाढते दर यांचा कोणताही परिणाम मिरची विक्रीवर झालेला दिसून येत नाही. या क्षेत्रात रमणलाल शहा, बाबुलाल भानाजी गुप्ता, किराणा शांतीलाल सरदारमल हे मोठे व्यावसायिक समजले जातात. तर सर्वाधिक खप कंटूर, लवंगी, बेडगी आणि काश्मिरी यांचा आहे.

जयंतीलाल जोहारमल परमार, मिरचीचे जुने विक्रेते

बाजारात मिळणार्‍या मिरच्या
कंटूर 300
लवंगी 300
काश्मिरी 800
बेडगी 700
शंकेश्‍वरी 440

Exit mobile version