खेळणी तुटल्याने आम्ही खेळायचे कसे?

लहान मुलांकडून विचारला जातोय प्रश्‍न
| पनवेल | राजेश डांगळे |
आताची पिढी मैदानी खेळ खेळत नाही. सतत मोबाइलमध्ये असते. त्यावरच खेळत असतात, असे म्हटले जाते. पण, त्यात त्यांची काय चूक. जर शहरातील मैदाने, उद्यानांची दुरवस्था झाली असेल तर मुले तरी काय करणार. तुटलेल्या खेळण्यांवर जाऊन खेळून इजा करून घेणार का? नवीन पनवेल सेक्टर 5 मधील गार्डनमधील खेळण्यांची भयानक अवस्था झाली आहे. उद्यापासून नाताळनिमित्त मुलांना सुट्टी असल्याने खेळण्यासाठी बच्चेकंपनीची गर्दी होईल. परंतु, खेळणी तुटल्याने आम्ही खेळायचे कसे, असा प्रश्‍न लहान मुले विचारत आहेत.

नवीन पनवेल सेक्टर 5 मधील गार्डन च्या लहान मुलांच्या खेळण्यांची दुरवस्था झाली आहे. येथील पाळणे तुटले आहेत. घसरगुंडीदेखील खराब झाली आहे. बसण्यासाठी असलेले टेबलसुद्धा तुटलेले आहेत. अशी गार्डनमधील खेळण्यांची अवस्था झाली असताना पनवेल महानगरपालिकेचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. उद्यापासून नाताळ सणानिमित्त शाळांना सुट्टी पडणार असल्याने शहरातील सर्व गार्डन, उद्यानांमध्ये गर्दी होणार आहे. परंतु, नाताळला दोनच दिवस बाकी पालिका नवीन साहित्य कधी आणणार, हा प्रश्‍न शेवटी बाकी आहे.

महापालिकेकडून कोट्यवधींची विकासकामे केली जातात. मात्र, उद्यानांवर दरवर्षी अर्थसंकल्पात केली जाणारी आर्थिक तरतूद ही वेळच्या वेळी खर्च केली जात असली तरी प्रत्यक्षात उद्यानांमधील खेळणी तुटलेली आहेत. तुटलेल्या खेळण्यांकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पर्यायच नसल्याने तुटलेल्या खेळण्यावरही काही मुले खेळत बसतात. तुटलेल्या खेळण्याचा वापर मुले करत असल्याने अपघात होऊ शकतो. मुलांना इजा होऊ शकते. याचा विचार महापालिकेने करणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

या उद्यानातील बसण्यासाठी ठेवलेल्या बाकांपैकी एखादा बाक हा वाकलेला आहे. याच उद्यानात घसरगुंडी आहे. त्या घसरगुंडीचे स्क्रू निघालेले आहेत. त्यामुळे तो भाग कधी निखळून पडेल, हे सांगता येणार नाही. खेळण्यासाठी असलेले पाळणे तुटलेले आहेत. तसेच, घसरगुंडी आहे. मात्र, तिची अवस्थाही म्हणावी तशी चांगली नाही. परिणामी, या गार्डनमधील खेळण्यांची देखभालीअभावी पूर्ण वाताहात झाली आहे.

Exit mobile version