मोदींची हुकूमशाही किती दिवस सहन करणार

काँग्रेस उमेदवारासाठी शरद पवार निपाणीत

। निपाणी । प्रतिनिधी ।

मोदी सरकार विविध आश्‍वासने देऊन सत्तेवर आले. पण, एकाचीही पूर्तता केली नाही. विरोधकांना संपविण्यासाठी कुठल्याही थराला ते गेले आहेत. दिल्लीत उत्तमरीतीने सरकार चालविले जात असताना, मोदींनी अरविंद केजरीवाल यांना कारागृहात पाठवले. त्यामुळे मोदींची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे, असा आरोप ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली निपाणीत बुधवारी (ता.1) सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले, भाजपने विविध प्रकारची अस्त्रे वापरून विरोधकांना अडकवण्याचे काम सुरू ठेवले आहे. शिवाय जनतेला भूलथापा देण्याचे कामही बंद नाही. याउलट राज्यातील काँग्रेस सरकारने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि गरिबांसाठी पंचहमी योजना अंमलात आणल्या आहेत. तरुणांकडे मोठी ताकद असून, त्यांना मोदी सरकार दुष्ट प्रवृत्तीकडे घेऊन जात आहे. परिणामी, देशात अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुढील काळात घटक पक्षांनी एकत्र येऊन मोदी सरकारला उलथवणे गरजेचे आहे.

पुढे ते म्हणाले, देशातील यावेळच्या निवडणुकीकडे जगातील लोकांचे लक्ष लागले आहे. अनेक देशांतील लोक निवडणूक वातावरण पाहण्यासाठी आलेले आहेत. मोदी यांची हुकूमशाही किती दिवस सहन करणार. 2014 मध्ये पहिल्यांदा ते सत्तेवर आले. त्यावेळी ते 50 दिवसांत पेट्रोलचे दर कमी करणार होते. आता मोदी यांची सत्ता येऊन 3650 दिवस झाले तरी, पेट्रोलचे दर कमी झाले नाहीत. आज पेट्रोलचे दर शंभरावर आहेत. विरोधक संपवून देशात एकाधिकारशाही करण्याचे त्यांचे कारस्थान आहे. लोकशाही या लोकांना पसंत नाही, हे त्यांच्या कृतीतून दिसून येते.

Exit mobile version