| माणगाव | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम गेली अनेक दिवस संत गतीने सुरु आहे. पहिल्याच टप्प्याचे काम रखडल्यामुळे त्या रुंदीकरणाच्या कामाचे तीनतेरा वाजले आहेत. त्यातच इंदापूर ते कशेडी घाटदरम्यानच्या रुंदीकरणाचे काम ठिकठिकाणी अपूर्ण असल्याने याचा फटका प्रवासी नागरिकांना बसत आहे. या मार्गावर सतत अपघात होत आहेत. नुकताच ट्रक व इको कार यांच्यात रेपोली गावाच्या हद्दीजवळ झालेल्या अपघातात इको कारमधील दहा प्रवासी मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत असून, अनेक निष्पाप प्रवाशांना बळी जावे लागत आहे. हा महामार्ग आणखी किती बळी घेणार, असा प्रश्न प्रवासी, पर्यटक, नागरिकांतून विचारला जात आहे.
महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढले असून, प्रवाशी नागरिकांना या महामार्ग रुंदीकरणाच्या कामाचा नाहक फटका बसत आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या नावाने कोकणात शिमगा चालू आहे. या अपघातमुळे चौपदरीकरणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पहिला टप्प्याचे पळस्पे ते इंदापूर पर्यंत महामार्गाचे रुंदीकरणाचे रखडलेले काम शासनाने त्वरित हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या दरम्यानच्या मार्गावर अनेक ठिकाणी कुठे मोर्यांचे, पुलांचे तर कुठे रुंदीकरणाचे काम तसेच भराव घालणे यांसह अनेक कामे ठिकठिकाणी अपूर्ण आहेत, ती पूर्ण करावीत. त्यामुळे प्रवाशांना पर्यटकांना या मार्गावरून प्रवास करणेसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
इंदापूर ते कशेडी घाट हा दुसरा टप्पा 84 कि.मी अंतराचा असून, पहिला टप्पा पळस्पे ते इंदापूर हा 87 कि.मी.चा आहे. या पहिल्या टप्प्याच्या कामाकडे सरकारने गांभीर्याने पाहिलेले नाही. सध्या इंदापूर ते कशेडी घाट मार्ग अरुंद असल्यामुळे या मार्गावर दिवसेंदिवस अपघातही मोठ्या प्रमणात होत आहेत. या वाढत्या अपघातामुळे पुन्हा एकदा प्रश्न महामार्गाच्या चौपदरीकरणाचा ऐरणीवर आला आहे.