अजून किती पहायची वाट?

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासावर अंनिसचे नितीन राऊत यांचा सवाल
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
यावर्षी 20 ऑगस्ट रोजी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला आठ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या खुनाच्या सूत्रधारांचे काय झाले? त्यांना कधी पकडणार? असा प्रश्‍न महाराष्ट्र अंनिसतर्फे शासनाला प्रसिद्धी पत्रकाद्वारे विचारण्यात आला आहे.
यामध्ये पुढे असे नमूद केले आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनातील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने 2016 मध्ये डॉ. विरेंद्र तावडे, ऑगस्ट 2018 मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे व मे 2019 मध्ये संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलेले आहे. अमोल काळे या संशयित आरोपीविरुद्ध सीबीआयने अजूनही आरोपपत्र दाखल केलेले नाही. तसेच अमित डिगवेकर व राजेश बंगेरा या संशयित आरोपींच्या विरुद्धदेखील अजूनही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही.
या खुनाचा तपास डॉ. वीरेंद्र तावडे व अमोल काळे यांच्या नावापर्यंत येऊन थांबलेला आहे. या खुनामागील सूत्रधार कोण आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास होऊन डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनामागील सूत्रधार कोण आहेत, हे सीबीआयने शोधून काढले पाहिजे, अन्यथा देशातील विवेकवादी विचारवंत, कार्यकर्ते, पत्रकार यांच्या अभिव्यक्तीला असलेला धोका संपणार नाही, असे मत व्यक्त केले आहे.
यासाठी महा. अंनिस कार्यकर्ते जिल्हा अधिकारी, तहसीलदार, शाआयुक्त यांच्यामार्फत लेखी पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात येणार आहे. तसेच शक्य असेल तिथे लॉकडाऊनचे नियम पाळून प्रत्यक्ष आंदोलन, निर्भय मॉर्निंग वॉक, धरणे धरणार आहेत व सोशल मीडियातील वेगवेगळ्या हँडलवरुन आवाज उठवून सरकारला जागे करणार आहेत, असे महा-अंनिस राज्य सरचिटणीस नितीन राऊत यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
न्यायालयात याचिका
डॉ. दाभोलकरांच्या खुनाच्या तपासावर न्यायालयाने देखरेख करावी यासाठी दाभोलकर आणि पानसरे कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयानेदेखील या कटाचे सूत्रधार लवकरात लवकर पकडले जावे, अशी अपेक्षा वेळोवेळी तपास यंत्रणांकडून व्यक्त केली आहे.

Exit mobile version