भारतीय निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड लोकसभा निवडणूक प्रक्रीयेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी स्थिर सर्वेक्षण पथक तैनात करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र कामात चोखपणा दिसला नसल्याचा आरोप माजी आ. पंडित पाटील यांनी केला आहे. जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पहारा, नाक्यानाक्यावर बंदोबस्त असताना गावात पैसा पोहचला कसा, असा सवाल पंडित पाटील यांनी व्यक्त करीत प्रशासनाच्या कारभारावर संशय व्यक्त केला आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थिर सर्वेक्षण पथक तयार करण्यात आले होते. जिल्ह्यातील अनेक भागात, कार्यक्रमाच्या ठिकाणी हे पथक येऊन पाहणी करीत होते. महामार्गासह नाक्यानाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथक तैनात केले होते. या पथकामार्फत येणार्या-जाणार्या वाहनांची तपासणी करण्यात आली. मात्र, ही यंत्रणा पुर्णतः फेल ठरल्याचा आरोप माजी आ. पंडित पाटील यांनी केली. सत्ताधार्यांच्या दबावाखाली यंत्रणा काम करीत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. निवडणुकीच्या काळात गावागावांमध्ये पाचशे रुपये प्रमाणे मतदारांपर्यंत पैशाचे बंडल पाठविण्यात आले. मात्र, त्याबाबत ही यंत्रणा अपयशी का ठरली, हा पैसा कसा पोहचला, असा संशय पाटील यांनी व्यक्त करीत प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.
