तुम्हीच सांगा, चौखूर उधळलेल्या महागाईमुळे जगायचं कसं ?

गेल्या 5 ते 6 वर्षांपासून सतत वाढत चाललेली महागाई रोखली कशी गेली नाही. महागाई संपवू असे आश्‍वासन देणार्‍या भाजपा राजवटीत महागाईने थैमान घातले असून नोटबंदी, जीएसटीने जनता हैराण झाली आहे. त्यामध्ये पेट्रोल-डिझेल शंभरी पार गेले असून गॅस ग्राहकांच्या खात्यात जमा होणारी सबसिडी बंद करण्याचा निर्णय जाहीरपणे का घेतला गेला नाही. बहुतेक लोकांचे पोट हातावर असते. या महत्त्वाच्या विषयावर दुर्लक्ष करून चालणार नाही!

भारतासह जगभरामध्ये गेल्या वर्षापासून सुरू झालेल्या कोरोना महामारीमुळे आपण सर्वजण अद्यापही कसोटीच्या काळामध्ये जगत आहोत. सकारात्मक विचार ठेवा, असे नेहमीच सांगितले जात असले तरी त्यालाही काही मर्यादा आहेत. कोरोनाचे युद्ध 21 दिवस लढायचे आहे असे सुरूवातीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. पण प्रत्यक्षात कोरोनाची लढाई पानिपतच्या युद्धासारखी लांबत गेली. या कोरोना महामारीमुळे आधीच संकटात सापडलेल्या सर्वसामान्य जनतेला महागाईच्या लाटेने तडाखे द्यायला सुरूवात केली. चौखूर उधळलेल्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून गरीबांचे जगणे आणखीन कठीण करणारे झाले. टाळेबंदीनंतर घरगुती गॅस सिलेंडरची एक टाकी हजार रूपयांच्या घरात गेली. गेल्या साडेसात वर्षात अर्थात 1 मार्च, 2014 रोजी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत रू.410.50 एवढी होती. ती आता नोव्हेंबर 2021 मध्ये रू.900 झाली. त्यावर काही शिजवायचे म्हटले तरी डाळी, तेल, मसाले आणि भाज्यांनीही आता दुप्पट दराकडे झेप घेतलेली आहे. पाम तेलाची किरकोळ किंमत 62.35% वाढून 145 रूपयांवर आली. ही आतापर्यंतची उच्च पातळी असून एक वर्षापूर्वी याची किंमत 85 रूपये प्रती लिटर तर 11 वर्षापूर्वी 49.13 रूपये एवढी होती. सुर्यफूल तेलाची किंमत 59% वाढून 180 रूपये एवढी झाली.

1 वर्षापूर्वी हाच दर 110 रूपये एवढा होता. मोहरीच्या तेलाची किंमत 175 रूपयांवर गेली. देशातील सहा खाद्य तेलाच्या मासिक किरकोळ किंमती जानेवारीपासूनच सर्वोच्च स्तरावर आहेत. खाद्यतेलाच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने भाज्या किंवा चपात्या बिगर तेलाच्या करायच्या का असा प्रश्‍न सर्वसामान्य गृहिणींकडून विचारला जाऊ लागला आहे. डाळी सुद्धा महागल्या असून तूरडाळ, चणाडाळ, मूगडाळीचे दर 8500 ते 8800 रूपये प्रती क्विंटल झाले आहेत. कांदे-बटाटे सुद्धा स्वस्त नाहीत. कामधंद्यासाठी बाहेर प्रवास करायचा तर पेट्रोल डिझेलने प्रती लिटर शतकी दर ओलांडून द्विशतकाकडे वाटचाल सुरू केली आहे. वाढत्या महागाईने जनता मेटाकुटीला आली असतानाच त्यात भर म्हणून एक रूपयात विकली जाणारी काडीपेटी आता दुप्पट भावाने म्हणजेच दोन रूपयाला मिळणार आहे. नुकत्याच 15 ऑक्टोबर दरम्यान पेट्रोेलच्या भावामध्ये कोथिंबीर, टोमॅटो मिळण्याची ही पहिलीच वेळ होती.

या महागाईने जनता मेटाकुटीला आली असतानाच रेल्वेने सुद्धा पॅसेंजर गाड्या बंद करून एक्सप्रेस, मेलच्या नावाखाली भाडेवाढ केली. बी.ई.एस.टी.ने सुद्धा इलेक्ट्रिक वातानुकुलित बससेवा सुरू करून जास्त भाडे आकारण्यास सुरूवात केली. दिवाळीच्या दिवसात चाकरमानी, मुले गावी जाणार म्हणून एस.टी. ने सुद्धा 17% भाडेवाढ केल्याने तिकीटाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामध्येच एस.टी.कर्मचार्‍यांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर संप केल्यामुळे एस.टी.बसेस बंद आहेत, त्याचा फटका प्रवाशांना बसला असून खाजगी गाड्यांमधून दामदुप्पट भाड्याने प्रवास लागला आहे. कोळसा टंचाई प्रकार गाजत असल्यामुळे विजेचे दर सुद्धा वाढले जातील! कदाचित भविष्यात प्राणवायू सुद्धा विकत घेण्याची वेळ येऊ शकते. एकूण दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या महागाईने सर्वसामान्यांचे महिन्याचे आर्थिक गणित पार कोलमडून पडले आहे. या विचित्र परिस्थितीचे चटके सहन करणारी कुटुंबे जिवंतपणी अक्षरशः मरणयातना भोगत आहेत. कोरोनाच्या नावाखाली तोंडावर बुरखा घेतला आहे. बाकीचे सर्व ताप दुर्लक्षिले जात आहेत. अशा वेळी उत्तरदायित्व असलेल्या केंद्र सरकारने जनतेची या महागाईच्या दुष्टचक्रातून सुटका करावयास पाहिजे. पण वेगवेगळ्या प्रकारची दरवाढ आणि करवाढ करून सामान्य माणसाच्या चिंतेमध्ये वाढ करण्याचा उपद्व्याप राज्यकर्त्यांकडून सुरू आहे.

लसीकरणाबाबत 35 हजार कोटीची तरतूद सरकारने अर्थसंकल्पात केली आणि ते उभे करण्यासाठी आतापर्यंत 23 ते 25 लाख कोटी रूपये पेट्रोेल-डिसेलच्या दरवाढीतून उकळलेले आहेत. देशामध्ये प्रथमच दुचाकी वाहन परवडत नाही म्हणून सायकलचा वापर जास्त सुरू झाला आहे. एकीकडे माणसांना घरात बसवून अर्थचक्र थांबवायचे, माणसांचा रोजगार काढून घ्यायचा, त्यांना अर्ध्या पगारात काम करावयास लावायचे. त्यांची क्रयशक्ति संपुष्टात आणायची आणि दुसरीकडे महागाईचा आगडोंब भडकावयाचा या धोरणामुळे सामान्य माणसांचे जगणं महाग होत चालले आहे. सरकार ह्या दरवाढीबाबत काहीच बोलत नाही. वाढत जाणार्‍या महागाईने जुन्या सरकारच्या काळातील सर्व विक्रम मोडीत काढले असून नवीन उच्चांक प्रस्थापित केले आहेत. महागाईच्या प्रश्‍नावर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत रस्त्यावर चुली घेऊन प्रदर्शन करणार्‍या, घसा बसेपर्यंत घोषणाबाजी करणार्‍या, कॅमेर्‍यासमोर येऊन महागाई विरोधात सरकारला जाब विचारणार्‍या तत्कालिन आंदोलकांची आता दातखीळ बसली आहे. सत्ताधार्‍यांविरोधात रस्त्यावर आले तरी कोणीही आपले ऐकणार नाही ही मानसिकता निर्माण झाली आहे.

सत्तेवर येण्यासाठी निवडणूक प्रचारात वापरलेली “बहोत हो गई महंगाई की मार’’ आणि पंतप्रधान आज आले होते. फिर ओ महंगाई की माँ बोलने को तैयार नही. मरो तो मरो, गरीबांच्या घरी चूल पेटत नाही. बच्चा रोता है, माँ आसू पिके सोती है । 4 तारखेला मतदान करायला जाल तर घरी असलेल्या गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा अशी बोलघेवडी भाषणबाजी 2014 साली केल्यामुळे लोकांनी विश्‍वास ठेऊन महागाई विरोधात लढणारा पक्ष म्हणून भाजपाला दिल्लीच्या तख्तावर बसविले. इंधनाच्या वाढत्या भावामुळे सार्वत्रिक महागाई वाढते पण त्या विषयावर बोलण्यास पंतप्रधान, अर्थमंत्र्यांना वेळ नाही. केंद्रातील मंत्र्यांच्या कारभाराला सलामच केला पाहिजे. सातत्याने होणारी महागाई रोखण्यात आलेल्या अपयशावर केंद्रातील मंत्री 7 वर्षांनंतरही कारभारातील खोट मान्य करायला तयार नाहीत. राज्यकर्त्यांकडून मदतीच्या मोठमोठ्या वल्गना केल्या जातात. मोठमोठ्या आकड्यांचे पॅकेजेस घोषित होतात. पण यातल्या एका नव्या पैशाची मदत सामान्य माणसापर्यत पोहचत नाही.

वाढत्या महागाईने देशात सुरू असलेल्या जनाक्रोशावरही सरकार असंवेदनशील बनलेले आहे. महागाई-बेरोजगारी नवे नवे उच्चांक स्थापन करीत आहे. सामान्य माणूस जगण्याचे वेगवेगळे पर्याय शोधतो आहे. आलेले संकट आज ना उद्या जाईल या आशेवर असून त्याला प्रत्यक्ष मदत करणे किंवा आर्थिक सहाय्य देणे जमत नसेल तर त्याच्या डोक्यावर कराचा नवीन भार येणार नाही. याची काळजी राज्यकर्त्यांनी घ्यायला हवी. पण ते नाहीच, उलट जनतेला जास्तीत जास्त कसे भरडता येईल या दृष्टीने केंद्र सरकार सध्या जीएसटी चे चार टप्पे आहेत ते तीन टप्पे करणार असून 5% जीएसटी रद्द करून तो 12% वर आणणार. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस सिलेंडरच्या किंमती भरमसाठ वाढविल्यानंतरही केंद्र सरकारचे मन भरलेले नाही. भाजीपाला, अन्नधान्याचे भाव सुद्धा या महागाईत चढे झालेले आहेत. जनतेला 2022 या नवीन वर्षाची भेट म्हणून 5% चा जीएसटी 12% केल्यामुळे कपडे, पादत्राणे यांच्या किंमती वाढणार आहेत. जनतेने चप्पलांऐवजी पायात लाकडी खडावा व अंगावर कपड्यांऐवजी झाडांची वल्कले नेसावी की काय? जनता ही भोळी भाबडी गरीब गाईप्रमाणे या वाढत्या महागाईचा भडका सहन करीत आहे त्यामुळे राजकारण बाजुला ठेऊन सामान्यांसाठी जगण्याचे साधन आणि पैसा हातात येईल आणि बाजारातील वस्तु, पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, नाहीतर महागाईचा विळखा अधिकाधिक घट्ट होऊन सामान्यजनांचा श्‍वास गुदमरल्याशिवाय राहणार नाही.

Exit mobile version