सरकारी कर्मचारी नाऊमेद झाला तर महाराष्ट्र चालणार कसा?

| मुंबई | प्रतिनिधी|

सरकारी कर्मचारी नाऊमेद झाला तर महाराष्ट्र चालणार कसा? असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत केला.

अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या तिसर्‍या आठवड्याच्या कामाचा प्रारंभ सोमवारी अवकाळी पाऊस, नुकसान भरपाई, सरकारी कर्मचारी संप आदी मुद्यांवरुन वादळी स्वरुपात झाला. यावेळी अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरले. अवकाळी पावसामुळे राज्यातला शेतकरी संकटात आहे, त्यातच सरकारी कर्मचारी संपावर आहेत, त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम ठप्प आहे, शेतकर्‍यांना कोणतीही मदत मिळत नाही, याकडेही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.

महाराष्ट्र संकटाच्या दुहेरी कात्रीत अडकला असताना 95 टक्के सरकारी कर्मचार्‍यांकडे हरामची कमाई आहे, अशी वादग्रस्त विधाने सत्ताधारी आमदार करत असून परिस्थिती आणखी चिघळवत आहेत. हाताची पाची बोटे सारखी नसतात हे मान्य आहे, मात्र असे सरसकट विधान करणे बरोबर नाही, सगळ्यांना एकाच मापात मोजणे चुकीचे आहे, त्यामुळे सरकारी कर्मचारी नाऊमेद झाला तर महाराष्ट्र चालणार कसा? असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला.

सरकारी कर्मचार्‍यांना त्यांचा हक्क मागण्याचा अधिकार आहे, मात्र राज्यातला बळीराजा संकटात असताना त्याला दिलासा देण्यासाठी नुकसानग्रस्त भागातल्या कर्मचार्‍यांनी कामावर हजर होण्याचे भावनिक आवाहन पवार यांनी केले. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासह सरकारी कर्मचार्‍यांचा प्रश्‍न सरकार असंवेदनशीलपणे हाताळत असल्याचा आरोप करुन विरोधी पक्षाने सभात्याग केला.

Exit mobile version