खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक, पर्यटक हैराण
। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
सुट्टीचा शेवटचा हंगाम एन्जॉय करण्यासाठी राज्यभरातून पर्यटक मुरूड, काशीद, नांदगाव बीचवर प्रचंड संख्येने आले असून, जागोजागी वाहनांनी पार्किंग फुल्ल दिसून येत आहे. सर्व लॉजिंग, हॉटेल्स पर्यटकांनी गजबजून गेली आहेत. मात्र, वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने नागरिक, पर्यटक, व्यावसायिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. काही पर्यटकांनी मुरूडमधून काढता पाय घेतला आहे. यामुळे व्यावसायिक आणि मुरुडकरांचे नुकसान होताना दिसत आहे.
पावसाचे ढगाळ वातावरण सर्वत्र दिसून येत असले तरी प्रत्यक्षात पाऊस लांबणीवरच पडला आहे. उलट, उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होताना दिसून येत आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, पालघर, सातारा, बीड, जळगाव, धुळे, नवी मुंबई आदी राज्याच्या विविध भागातून आलेल्या पर्यटकांनादेखील याची झळ पोहोचल्याचे दिसून आले. शुक्रवारपासून मोठ्या संख्येने मुरूड, काशीद, नांदगाव बीचवर पर्यटक आनंद लुटण्यासाठी आले असून, आगामी आठवड्यापर्यंत पर्यटकांचा हाच ओघ राहील, अशी माहिती मुरूड येथील हिरा रेसिडेन्सीचे मालक महेंद्र पाटील यांनी दिली. मुरूड समुद्र तूर्तास शांत असल्याने पर्यटक पोहण्याचा आनंद लुटताना दिसत होते. स्टॉलधारकांच्या व्यवसायाला सध्या सुगीचे दिवस दिसत आहेत.
शासनाने पर्यटनवाढीसाठी अधिक सुविधा केल्यास पर्यटक स्थिर राहतील, असे मत तज्ज्ञ व्यक्तींनी व्यक्त केले. मुरूड परिसरातील जी धार्मिक, निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळे आहेत, त्यांचा विकास करणे ही काळाची गरज आहे, अशी अपेक्षा पर्यटकांनीदेखील व्यक्त केली आहे. खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे मात्र सर्वत्र संतापाची भावना असून, वीज मंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाने याची दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मुरुडकरांनी मागणी केली आहे.