रस्त्यासाठी नागावकरांची मानवी साखळी

दोन महिन्यात रस्त्याचे काम पुर्ण करण्याचे सरपंच निखिल मयेकर यांचे आश्वासन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

नागाव बंदरापर्यंतचा रस्ता तातडीने पूर्ण करावा, या मागणीसाठी बुधवारी नागावकरांच्यावतीने मानवी साखळी करुन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. नागाव ग्रामस्थांतर्फे करण्यात आलेल्या या आंदोलनास उदंड प्रतिसाद लाभला. नागावचे सरपंच निखील मयेकर यांनी या आंदोलनाला सामोरे जात रस्त्याच्या कामाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मंजुरी दिल्याचे पत्र तसेच वर्क ऑर्डर दाखवल्यानंतर मिळालेल्या आश्‍वासना अंती हे आंदोलन स्थगित करण्यात आले. दोन महिन्यात रस्त्याचे काम पुर्ण न झाल्यास स्वतः काम पुर्ण करुन देण्याचे आश्‍वासन यावेळी सरपंच निखील मयेकर यांनी दिले. तसेच ग्रामस्थांच्या मागणीनुसार काम पुर्ण होईपर्यंत टोल आकारण्यात येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

नागाव बंदर ग्रामस्थांच्या वतीने या आंदोलनात सचिन राऊळ, परेश ठाकूर, रुपेश पाटील, विकास पिंपळे, ज्योती राऊळ, नितीन पाडेकर, सौरभ आपटे, सुहानी आपटे आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते. नागांव बंदर रस्त्याच्या कामासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी प्रयत्न करीत कामाला मंजुरी आणली होती. त्यानुसार कामाला सुरुवात देखील करण्यात आली. मात्र त्यानंतर जिल्हा परिषदेवर प्रशासक नेमण्यात आल्याने सुरु असलेल्या कामाला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे हे काम अपूर्ण राहिले. ते काम पूर्ण केले जावे, या प्रमुख मागणीसाठी मानवी साखळी करुन आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात महिलांचाही सहभाग मोठा होता. हातात बॅनर्स घेऊन महिलांनी रस्ता झालाच पाहिजे, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

मुख्य रस्त्याच्या दुतर्फा नागाव ग्रामस्थांनी मानवी साखळी करीत शासनाचे लक्ष वेधून घेत निषेध केला. नागाव टोलनाक्यापासून निघालेला हा मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयावजवळ थांबला. आज नागाव ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली आणि ग्रामपंचायतीला निवेदन दिले आणि ग्रामस्थांनी मांडलेल्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. रायगड जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून काही कर्मचारी आंदोलन स्थळी दाखल झाले . त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी नागाव शिवाजी महाराज पुतळा ते नागाव बंदर पर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी 18 लाख 37 हजार रूपयांचा निधी मंजूर केल्याचे पत्र देण्यात आले. तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच नि खील मयेकर यांनी पुढील दोन महिन्यात रस्त्याचे काम पूर्ण करण्याची हमी दिली. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

या आंदोलनादरम्यान शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शेकाप पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष विक्रांत वार्डे, शिवसेना तालुका प्रमुख शंकर गुरव आदींनी तसेच संकल्प सिद्धी मिनिडोर संघटनेने पाठिंबा व्यक्त केला.

Exit mobile version