गोरगरिबांच्या तोंडचा घास काळाबाजारात
| ठाणे | प्रतिनिधी |
गोरगरिबांच्या तोंडचा घास हिरावून रेशनिंगवरील धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांचा डाव शहापूर पोलिसांनी उधळला आहे. शहरात पेट्रोलिंग सुरू असताना एका खासगी गोडाऊनबाहेर उभ्या असलेल्या ट्रकची झाडाझडती घेतली असता त्यात शेकडो क्विंटल तांदूळ व गहू आढळून आला. याबाबत पोलिसांनी माहिती देताच त्याची गंभीर दखल घेत तहसीलदार व पुरवठा अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेत ट्रकसह लाखो रुपये किमतीचे धान्य जप्त केले आहे. त्यामुळे रास्त धान्य दुकानातील तांदूळ व गव्हाचा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
क्विंटल तांदूळ व पाच क्विंटल गहू असा 165 क्विंटल धान्य साठा होता. हे धान्य भिवंडी येथील शासकीय गोदमातून शहापूर तालुक्यातील अघई येथील रेशन दुकानात जाणार होते, अशी माहिती शहापूर तहसील दार परमेश्वर कासुळे व पुरवठा अधिकारी अमृता सूर्यवंशी यांनी दिली. मात्र, ट्रकचालकाने धान्याने भरलेला ट्रक अघई येथील रेशन दुकानात जाण्याऐवजी शहापुरातील अर्चना इंग्लिश मिडीयम स्कूलसमोर असलेल्या एक खाजगी गोडाऊनलगत उभा केला. शहापूर पोलिसांना याबाबत संशय आल्याने पोलिसांनी ट्रकचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. याबाबत तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर धान्याचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ट्रकचालक एजाज शहा याला अटक केली आहे.
मोठी टोळी असण्याचा संशय
जप्त केलेल्या ट्रकमध्ये 50 क्विंटल तांदळाच्या 320 तर गव्हाच्या 10 गोणी असे 165 क्विंटल धान्य होते. याबाबत पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी तहसील दार परमेश्वर कासुळे व पुरवठा निरीक्षकांना माहिती दिली. याप्रकरणी ट्रकचालक एजाज शहा याला अटक केली असून, त्याच्या चौकशीतून अधिक माहिती मिळणार आहे. या रॅकेटमध्ये मोठी टोळी सहभागी असण्याचा संशय पोलिसांना आहे.
वाहतूक ठेकेदाराची चौकशी करा
शहापूरच्या गोदामातून शहापूर तालुक्यातील रेशन दुकानदारांना धान्याचा पुरवठा होणे क्रमप्राप्त आहे. मात्र, भिवंडी येथून थेट शहापूरच्या रेशन दुकानात तब्बल 165 क्विंटल धान्य पाठवण्यात आल्याने यामागे काही काळेबेरे असण्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी वाहतूक ठेकेदाराबरोबरच अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे.







