। तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या तळा फॉरेस्ट हिल्स रिसॉर्टमधील शेकडो कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आले आहे. यामुळे येथील कामगार बेरोजगार हाऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तालुक्यातील बोरभाटला येथे उभारण्यात आलेल्या तळा फॉरेस्ट हिल्स रिसॉर्टमध्ये गेल्या तेरा वर्षांपासून कामगार काम करीत आहेत. या ठिकाणी मोठमोठे मराठी व हिंदी सिनेअभिनेते भेट देत असल्याने अल्पावधीतच या रिसॉर्टची ख्याती सर्वदूर पसरली आहे. परंतु, व्यवसाय चालू झाल्यापासून कामगारांना वेळोवेळी न सांगता अनिश्चित कालावधीसाठी ब्रेक देणे, कामगारांना बोनस न देणे, स्थानिकांना डावलून बाहेरील लोकांना कामावर घेणे, कामगारांना पीएफ न देणे, कोणालाही कायम न करणे, वाढीव पगार न देणे अश्या अनेक गोष्टी घडत होत्या. यातच रिसॉर्ट प्रशासनाकडून जवळपास शंभरहून अधिक स्थानिक कामगारांना अचानकपणे अनिश्चित कालावधीसाठी कामावरून काढून टाकल्याने येथील कामगार आक्रमक झाले आहेत.
यावेळी पिडीत कामगारांनी स्थानिक नेत्यांची भेट घेऊन सविस्तर प्रकार सांगितला असता त्यांनी फॉरेस्ट हिल्स रिसॉर्टचे मालक विरेश छाबरा व संबंधित ईतर मान्यवरांशी कामगारांसह बैठक घेतली. परंतु, कंपनीचे मालक कामगारांना परत कामावर घेण्यास तयार नसून इतर कोणतीही मागणी मान्य करण्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले नाही. यामुळे सर्वच्या सर्व कामगारांना कामावर घेणार नसाल तर आम्हीदेखील इतर कोणतीही चर्चा करणार नाही. असा पवित्रा घेत वेळप्रसंगी कामगारांच्या हक्कासाठी कायदा हातात घेऊ पण कामगारांना न्याय देऊन त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवू, असा सज्जड दम त्यांनी रिसोर्ट व्यवस्थापनाला दिला आहे.







