भाडे थकल्याने आत्महत्येची वेळ; मुख्यमंत्र्यांना साकडे
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
कोरोनाच्या महामारीत सुधागड तालुक्यातील 62 रास्त भाव धान्य दुकानात रेशन वितरित करणार्या सहा वाहनचालकांना अद्यापदेखील थकीत भाडे रक्कम मिळालेली नाही. वारंवार मागणी करूनही कोणत्याही प्रकारे सहकार्य मिळत नसल्याचा संताप या वाहनचालकांनी व्यक्त केलाय. स्वतःच्या खिशातील पदरमोड करून कर्ज उसनवारी काढून डिझेल खर्च केला, मात्र अद्याप आम्हाला एक दमडी ही दिली नसल्याने आमच्यावर उपासमार व त्याही पुढे जाऊन आत्महत्येची वेळ आली असल्याचे रेशन वितरित करणार्या सहा वाहनचालकांनी सांगितले.
थकीत भाडे न मिळाल्याने आमच्यावर आत्महत्येची वेळ आली असल्याचे वाहनचालक संजय बारस्कर, सुनील उंबरठकर, अरविंद उंबरठकर, संतोष शिंदे, शंकर शिंदे, सचिन भोईर यांनी सांगितले. या वाहनचालकांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन देऊन आपली थकीत रक्कम मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. तक्रारी निवेदनात म्हटले आहे की पाली सुधागड तहसील कार्यालय अन्न धान्य गोडाऊन येथून कोरना काळात मार्च 2020 ते सप्टेंबर 2020 कालावधीमध्ये आम्ही आमची वाहने घेऊन तालुक्यातील सर्व ठिकाणच्या रास्त भाव धान्य दुकान यांना तहसील कार्यालय पाली अन्न धान्य गोडाऊन येथून धान्य उचलून ते रास्त भाव धान्य दुकानपर्यंत सरकारी आदेशाप्रमाणे मोफत धान्य व विकत धान्य पोचविण्याचे काम केले.
यावेळी गोदामपाल म्हणून कमलेश गुंड हे काम पाहात होते. त्यावेळी वाहनचालक यांनी भाडे मिळण्यासाठी कमलेश गुंड यांना विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे देण्यास सुरुवात केली. परंतु एक वर्षे होऊन गेल्यानंतर सुधागड तालुक्यातील तहसीलदार यांना अर्ज करून न्याय मागण्याचे प्रयत्न केले. परंतु, आम्हाला कोणीही न्याय देत नाही, अशी व्यथा या वाहनचालकांनी मांडली. कोरोना महामारीत या वाहन चालकांपुढे उपासमारीची वेळ आली आहे. स्वतःच्या खिशातील दीड लाख रुपये खर्च केले आहेत, जर लवकर पैसे मिळाले नाहीत तर आमच्या जीवनाचा शेवट करण्याची वेळ आली आहे. असे सुनिल व अरविंद, दगडू उंबरठकर या दोन भावांनी सांगितले.
कोरोना काळात माझ्या मुलीचे लग्न होते, यावेळी मी सर्वस्व शासनाकडून थकीत रक्कम मिळेल या आशेवर होतो, मात्र सदर पैसे न मिळाल्याने मला माझे उदरनिर्वाहाचे साधन असलेले वाहन विकावे लागले अशी व्यथा शिंदे यांनी मांडली. – शंकर शिंदे
जिल्हाधिकारी यांनी रास्त भाव धान्य दुकानात धान्य पोहोचविण्याचा ठेकेदाराला ठेका दिला, त्यांनी सबठेकेदार यांना काम दिले, जिल्हा पुरवठा विभागाकडून मुख्य ठेकेदार यांना सदरचे बिल तात्काळ वितरित करण्यात आले आहे. – बोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी