दर्जाहीन कामांविरोधात साखळी उपोषण

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

गेली दोन वर्षे मिर्‍या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात महाराष्ट्र वीज वितरण कंपनी व लिना पॉवरटेक कंपनी यांच्यामार्फत भूमीअंतर्गत वीज वितरण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम करताना मिर्‍या नळपाणीपुरवठा पाईपलाईन वारंवार फुटल्याने पाणीपुरवठा करताना मोठया प्रमाणात अडचणी आल्या आहेत. यामुळे गावात वाद निर्माण झाले आहेत, तसेच विद्युत केबल टाकताना योग्य ती खबरदारी घेतली नसल्याने सहा जनावरे शॉक लागून दगावली आहेत. सुरक्षेच्या उपाययोजना योग्य प्रकारे केल्या गेल्या नसल्याने भविष्यात दुर्घटना होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच, स्ट्रीट लाईटचे दर्जाहिन आणि बेजबाबदार काम अशा समस्या वारंवार निदर्शनास आणूनही कामामध्ये सुधारणा केली गेली नाही. यामुळे गावकरी संतापले असून त्यांनी जिल्हाधिकारी कचेरीसमोर साखळी उपोषण केले आहे. सोमवारपासून मिर्‍याच्या सरपंच आकांशा कीर, उषा कांबळे, आदिती भाटकर, स्मिता शिरधनकर, मानसी शिरधनकर, आर्या सावंत, रामदास बनप, आदेश भाटकर, गुरुप्रसाद माने, विजेंद्र कीर यांच्यासह ग्रामस्थ, माजी सरपंच बावा नार्वेकर, संदीप शिरधनकर, भैय्या भाटकर यांनी साखळी उपोषण सुरु केले आहे.

Exit mobile version