रायगड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील उल्हास नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात दगडी भिंत घालून बांधकाम केले जात आहे. तसेच नदी पात्रात करण्यात येत असलेले बांधकाम उद्ध्वस्त करण्यात यावे या मागणीसाठी पोलीस मित्र संघटना शुक्रवारी (दि.8) मार्चपासून उपोषणाला बसणार आहे. त्याबाबत रायगड जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन आंदोलन करण्याचा आणि कारवाई करण्याचा इशारा दिला.
पोलीस मित्र संघटनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन उल्हास नदीमध्ये सुरू असलेले अतिक्रमण तत्काळ थांबविण्याची मागणी केली. तालुक्यातील उल्हास नदिपात्रातील सर्व अतिक्रमणावर कायदेशीर कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश कदम यांनी यापूर्वी उपोषण केले होते. त्यावेळी रायगड पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता यांनी उल्हास नदिपात्रातील आणि कालव्यातील अतिक्रमणधारकांची आणि नदी पात्रातील तसेच कालव्यातील बेकायदेशीर पाणी उपसाधारकांची यादी पाठवली जाईल असे आश्वासन दिले होते. त्यावेळी आंदोलन मागे घेवून एक वर्षे उलटले आहे. तरीही कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही, म्हणुन त्यावेळी स्थगित केलेले उपोषण 8 मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे.