। रेवदंडा । प्रतिनिधी ।
रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे सुडकोली येथे जुन्या जागेच्या कुंपणाच्या वादातून एका ज्येष्ठ नागरिकासह त्यांच्या पत्नीला बांबूच्या दांडक्याने मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि. 6) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दशरथ म्हात्रे (60) हे सुडकोली बस स्टॉप येथे एस.टी. बसची प्रतीक्षा करत बसले असताना त्यांचे शेजारी सुदर्शन पाटील तेथे आले. मागील जागेच्या कुंपणाच्या वादाचा राग मनात धरून आरोपीने तक्ररदार यांच्या पाठीमागून येत हातातील बांबूच्या दांडक्याने त्यांच्या पाठीवर व डाव्या हातावर वार केला. मारहाणीदरम्यान दशरथ म्हात्रे यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असता दांडक्याचा फटका त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्यालगतच्या बोटावर बसून दुखापत झाली. तसेच, त्यांच्या पाठीवर आणि डाव्या डोळ्याजवळही मार लागला. यावेळी तक्रारदार यांना वाचविण्यासाठी त्यांची पत्नी दर्शना म्हात्रे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने त्यांनाही कंबरेवर व उजव्या पायाच्या पोटरीवर बांबूच्या दांडक्याने मारहाण केली आहे. या घटनेत दशरथ म्हात्रे आणि दर्शना म्हात्रे हे दोघेही जखमी झाले आहेत. मारहाणीनंतर आरोपीने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप केला आहे. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात सुदर्शन पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस हवालदार ठाकूर करीत आहेत.
Sudakoli Crime: सुडकोली बस स्टॉपवर पती-पत्नीला मारहाण
