| पनवेल | प्रतिनिधी |
सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढून टाकल्याचा राग मनात धरून मारहाण केल्याप्रकरणी युवराज उत्तम घागरे, अमृत रवींद्र बेलदार, ओमकार मोकल (तिघेही रा. बागेश्री सोसायटी, खारघर) यांच्या विरोधात तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विश्वास धनावडे हे बागेश्री सोसायटी, सेक्टर 40, खारघर येथे राहत असून, त्यांच्या सोसायटीतील आशिष याने अमृत बेलदार व ओमकार मोकल यांना सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड केले. ते सोसायटीचे सभासद नसल्याने त्यांना धनावडे यांनी ग्रुपमधून काढून टाकले. त्यानंतर त्यांना ओमकार याने फोन करून बिल्डिंगच्या खाली बोलाविले. यावेळी तुम्ही ग्रुपमध्ये गैरसमज पसरवत आहेत व माझ्या नावाची बदनामी करत आहात म्हणून तुम्हाला ग्रुपमधून काढून टाकल्याचे धनावडे यांनी सांगितले. यावेळी अमृतने धनावडे यांना हाताबुक्क्यांनी डोक्यात मारहाण केली तर ओमकार व युवराज यांनी काठीने मारहाण केली. त्यांची पत्नी सोडवण्यासाठी आली असता तिचेदेखील केस ओढून आणि तिला किरकोळ दुखापत केली.







