| संगमनेर | प्रतिनिधी |
चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा कुऱ्हाडीने निर्घृण खून केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे गुरुवारी (दि.31) मध्यरात्री घडली. चंद्रकला दगडू खंदारे (60) असे मृत महिलेचे नाव असून, पती दगडू लक्ष्मण खंदारे याला घारगाव पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दगडू खंदारे यास आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. बुधवारी (दि.30) रात्री साडेआठच्या सुमारास त्याने पत्नीशी याच कारणावरून वाद घातला आणि तिच्यावर शिवीगाळ केली. त्यानंतर तो शेतातील खोलीत झोपण्यासाठी निघाला. पण तेव्हाही तो पत्नीला शिवीगाळ करत होता. मध्यरात्री एक वाजता मुलगा वडिलांना पाहण्यासाठी गेला असता, त्याला आई चंद्रकला या रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आली. घटनास्थळी एक कुऱ्हाड ही सापडली. यानंतर घडलेल्या घटनेची माहिती तत्काळ घारगाव पोलिसांना देण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनीही घटनास्थळी भेट दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथे पाठवण्यात आला. याप्रकरणी भीमा खंदारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून घारगाव पोलिसांनी दगडू खंदारे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पुढील तपास घारगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात करीत आहेत.







