| नागपूर | प्रतिनिधी |
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. महामार्गावर भीषण अपघात झाल्यानंतर रस्त्यावर मदतीसाठी कुणीही थांबलं नाही. शेवटी हतबल पतीने मृतदेह दुचाकीवर बांधून नेला. महामार्ग पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मेयो रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर-जबलपूर महामार्गावर मोरफाटा परिसरात ट्रकने दुचाकीला धडक दिली. या धडकेत ग्यारसी अमित यादव या महिलेचा मृत्यू झाला. यावेळी महामार्गावर मदतीसाठी कुणीही थांबलं नाही. हतबल झालेला पती अमित भुरा यादव यानं मृतदेह दुचाकीवर बांधून नेण्याचा निर्णय घेतला.
नागपूरमध्ये राहणारा अमित आणि ग्यारसी हे रक्षाबंधनसाठी लोणारा इथून करणपूरला निघाले होते. त्यावेळी मागून आलेल्या ट्रकनं कट मारल्यानं ग्यारसी खाली पडली आणि ट्रकच्या चाकाखाली गेली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. अमितनं हात जोडून मदतीसाठी अक्षरश: भीक मागितली. मात्र कोणीही मदतीसाठी थांबले नाही. रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पत्नीचा मृतदेह न्यायचा कसा? असा प्रश्न पडलेल्या अमितने शेवटी दुचाकीला मृतदेह बांधला आणि मध्य प्रदेशातील सिवनीच्या दिशेने निघाला.
दरम्यान, अमित गाडीवरून मृतदेह घेऊन जात असताना काही जणांनी त्याला थांबवले; परंतु भितीने तो गाडी चालवतच राहिला. अखेर महामार्ग पोलिसांनी त्याला अडवला आणि त्याची चौकशी केली. त्यानंतर ग्यारसीचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी नागपूरच्या मेयो रुग्णालयात पाठवला. हायवे पोलिसांनीच पत्नीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पतीचा व्हिडीओ शूट केला आहे.







