पनवेल महानगरपालिकेतर्फे स्वच्छता स्पर्धा

। पनवेल । वार्ताहर ।
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पनवेल महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असलेले स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये स्वच्छता विषयक उपक्रम जास्तीत जास्त लोकाभिमुख होण्याकरीता तसेच नागरीकांच्या स्वच्छते विषयक वर्तणुकीमध्ये बदल घडविण्याकरीता माहिती शिक्षण प्रसार व जनजागृती अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांना कचरा वर्गीकरण व प्रक्रिया तसेच इतर स्वच्छता विषयक उपक्रम राबविण्यास प्रोत्साहन देणे तसेच यामध्ये सातत्य ठेवून रहिवाशांच्या सवयीत बदल घडविण्याच्या दृष्टीने शहरातील हॉटेल्स, शाळा (खाजगी गट व पनवेल महानगरपालिका शाळा), हॉस्पिटल्स, गृहनिर्माण संस्था / मोहल्ला शासकीय कार्यालय व मार्केट या प्रमुख विभागात स्वच्छता स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.


या स्वच्छता स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍या संस्थांना 10 जानेवारी, 2022 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. सदर स्पर्धेचे प्रत्यक्ष स्थळी परिक्षण व गुणांकन होईल व त्या अनुषंगाने निकाल जाहीर केला जाईल. सदर स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही, स्पर्धेच्या कालावधीत व नियमात फेरफार करण्याचा अधिकार स्पर्धां समितीकडे राहील. अधिक सविस्तर माहिती करीता swachhpanvel.competition 2022gmail.com या ई-मेल आयडी वर संपर्क साधावा. विजेत्या संस्थांना पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी होणार्‍या संस्थांना प्रशीस्तपत्रक प्रदान करण्यात येणार आहे.

Exit mobile version