| पेण | प्रतिनिधी |
महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मीच आहे, असे शेतकरी कामगार पक्षाचे पेण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अतुल म्हात्रे यांनी सांगितले. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात मंगळवारी (दि. 6) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील माझेच नाव महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे इतर कुणी स्वतःला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून संबोधत असेल, तर ते धूळफेक करत आहेत.
दरम्यान, अतुल म्हात्रे यांनी महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांचा खरपूस समाचार घेत निष्क्रिय लोकप्रतिनिधी असा उल्लेख केला. दोन वेळा आमदार, मंत्री अशी महत्त्वाची पदे घेऊनही पेण मतदारसंघाचा विकास करता आला नसल्याने जोरदार हल्ला चढविला. तर शिवसेनेचे उमेदवार प्रसाद भोईर यांना आज इथे, उद्या तिथे उड्या मारणारा माणूस असल्याचादेखील त्यांनी उल्लेख केला. महत्त्वाची बाब म्हणजे, कालपर्यंत भाजपा, नंतर अपक्ष आणि एकाएकी शिवबंधन अशाप्रकारे प्रवास करणारा, ध्येयधोरण नसणारा व्यक्ती मतदारसंघाचा विकास कसा करेल, असाही प्रश्न उपस्थित केला. पुढे त्यांनी प्रसाद भोईर हे महायुतीच्या बी टीमचे सदस्य असल्याचेदेखील सांगितले. भविष्यात या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी कटिबद्ध असणार आहे. या मतदारसंघात पर्यावरणपूरक पर्यटन रोजगार उपलब्ध करुन देणार असून, येथील स्थानिकांना उद्योजक बनविण्याचा माझा मानस असल्याचे म्हात्रे म्हणाले. येत्या काही दिवसात जाहीरनाम्याच्या रुपाने आपण सगळ्या योजना मतदारांपुढे मांडणार आहोत, असेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेसाठी पेण तालुका चिटणीस महादेव दिवेकर, निलेश म्हात्रे, प्रल्हाद पाटील, दिपक पाटील आदी मान्यवरांसह शेकापचे कार्यकर्ते उपस्थित होते.