| बीड | वृत्तसंस्था |
भाजपा नेत्या पंकजा मुंडे या दरवर्षी घेत असलेला दसरा मेळावा हा कायमच चर्चेचा विषय ठरतो. आज भगवान बाबा की जय अशा घोषणा देत पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. बीडमध्ये सावरगाव या ठिकाणी आयोजित दसरा मेळाव्यात त्यांनी जमलेल्या जनसमुदायाला संबोधित केलं. मी निवडणूक हरले असले तरीही तुमची मान खाली जाईल असं मी कधी वागलेले नाही. राजकारणात जय-पराजय होतच असतात. मी पडले ते झालं, आता मी पाडणार असं म्हणत पंकजा मुंडे यांनी त्यांचा निर्धार बोलून दाखवला.
“गोपीनाथ मुंडे यांनी जे स्वप्न तुम्हा सगळ्यांसाठी पाहिलं आहे त्यासाठी मी आता मैदानात उतरणार. मी पडले ते झालं.. आता पाडणार आहे. कुणाला पाडणार? जो चारित्र्यहीन असेल आणि पैशांच्या जोरावर राजकारण करत असेल त्याला पाडणार. जो शेतकऱ्यांच्या हिताचं राजकारण करत नसेल त्याला पाडणार. जो तरुणांना बेरोजगारीच्या संकटातून काढणार नाही त्याला पाडणार. जो या महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करुन देण्यात अडसर बनत असेल त्याला पाडणार आहे. आता फक्त गुणवत्ता राहिल. समाजासाठी सेवा करणारे नेतृत्व, चारित्र्यसंपन्न नेतृत्व घडवण्यासाठी मी रात्रीचा दिवस एक करणार. मला काही मिळो न मिळो पण पुढची पिढी गोड जेवण जेवेल यासाठी मी माझं आयुष्य खर्ची घालणार आहे.” असा निर्धार पंकजा मुंडेंनी बोलून दाखवला.