श्रावणी थळेने व्यक्त केली इच्छा
| चौल | प्रतिनिधी |
‘मला इस्त्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत शास्त्रज्ञ व्हायचं असून, देशाची सेवा करायची आहे’, अशी इच्छा पनवेल तालुक्यातील सीकेटी विद्यालयात इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत 98.80 टक्के गुण मिळवणाऱ्या श्रावणी अमर थळे या विद्यार्थिनीने व्यक्त केली. नुकताच दहावीचा निकाल लागला असून, त्यामध्ये श्रावणीने उत्तुंग यशाला गवसणी घातली आहे. सतत अभ्यास करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणताही तणाव न घेता मोकळ्या मनानं अभ्यास करा, असं श्रावणी सांगते.
श्रावणी ही मूळची अलिबाग तालुक्यातील पंतनगर येथील रहिवासी असून, तिचे आईवडील नोकरीनिमित्त पनवेल तालुक्यात स्थानिक आहेत. श्रावणीने मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, सीकेटी विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण, वर्गशिक्षिका मंजुषा भगत, पर्यवेक्षिका निरजा अधुरी, आई-वडील, आजी आणि आजोबा यांना तिनं यशाचं श्रेय दिले आहे. श्रावणीचे वडील अमर थळे हे मॅक्लोईड फार्मा या औषधनिर्मिती कंपनीमध्ये उच्च पदस्थ अधिकारी असून, आई रिना थळे ह्या सीकेटी विद्यालयामध्ये शिक्षिका आहे. श्रावणीचे आजोबा राम थळे सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी असून, उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून महाराष्ट्राच्या संघाचेही प्रतिनिधीत्व केले आहे. संपूर्ण कुटुंबाला शैक्षणिक वारसा लाभल्याने त्याचा फायदा मला माझ्या वर्षभराच्या अभ्यासात झाल्याचे श्रावणीने अभिमानाने सांगितले. शाळेतील शिक्षकांनी घेतलेली मेहनत, वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, आई-पप्पांनी दिलेला पाठिंबा आणि त्या जोडीला नियमित केलेला अभ्यास यामुळेच चांगले गुण मिळवण्यात यशस्वी झाले, असेही श्रावणी म्हणाली. सध्या जेईईची तयारी सुरू असून, भविष्यात इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून मला काम करुन देशाची सेवा करायची आहे, असेही श्रावणीने सांगितले.
अलिबागची कन्या पनवेलमध्ये चमकली श्रावणी मूळची अलिबाग-पंतनगरची रहिवासी आहे. तिने मिळवलेल्या उत्तुंग यशामुळे संपूर्ण राज्यासह रायगड जिल्ह्याबरोबरच अलिबाग आणि पनवेल तालुक्याच्या नावलौकिकात भर घातली. श्रावणी उत्कृष्ट भरतनाट्यम नृत्यांगणा असून, आतापर्यंत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच जिल्हा आणि तालुका पातळीवर विविध पुरस्कार प्राप्त केले आहेत. नृत्य स्पर्धेत ती पुणे विद्यापीठाची सुवर्णपदक विजेती आहे. अभ्यास आणि नृत्य या दोन्हींमध्ये तिने आपल्या मेहनतीने नावलौकिक प्राप्त केला आहे. येत्या 1 जून रोजी तिच्या संपूर्ण टीमला अयोध्येला नृत्य सादरीकरणासाठी पाचारण करण्यात आले आहे.
मेहनत घेण्याची तयारी ठेवा, यश निश्चित मिळेल, असेच मी माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना सांगेन. माझ्या यशामागे शिक्षकांचा जसा मोठा वाटा आहे, तसाच माझ्या आई-पप्पांचा आहे. अभ्यासाबरोबरच माझा नृत्याचा सरावही कायमच सुरू होता. आई-पप्पांनी मला कधीच हे कर, ते करु नकोस, असा दबाव टाकला नाही. कायम दोन्ही क्षेत्रात पाठिंबा आणि मोकळीक दिली. म्हणूनच मी जे काही यश संपादन केले, त्याचं श्रेय त्यांना आहे.
श्रावणी थळे