मी यापुढे निवडणूक लढणार नाही: एकनाथ खडसे

। मुंबई । प्रतिनिधी ।

मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाही, अशी घोषणा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी एका मुलाखतीत केली आहे. मी राजकीय निवृत्ती घेतलेली नाही. राजकारणात पुढे काहीही होऊ शकते, मात्र, आता माझा निवडणूक लढवण्याकडे कल नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाही. मी अजून ही पाच वर्ष विधान परिषदेचा आमदार आहे. शरद पवारांनी सांगितले आहे की, आम्ही दिलेली वस्तू परत घेत नाही. मला शरद पवार यांनी अभय दिल्यानंतर इतर लोकं माझा विधान परिषदेचा राजीनामा मागत असतील तर मला त्याच्याशी देणंघेणं नाही. मी राजकीय माणूस आहे. मी राजकीय निवृत्ती घेतलेली नाही. राजकारणात पुढे काहीही होऊ शकते, मात्र, आता माझे निवडणूक लढवण्याकडे कल नाही. शरद पवारांना पक्ष सोडताना काय सांगितले, हे आता सांगणार नाही, काही गोष्टी माझ्यासाठी राखीव राहू द्या, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारवर लोकांची नाराजी
एकनाथ खडसे म्हणाले की, रावेरची निवडणूक जाहीर झाल्यापासून मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे सूचित केले होते. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यामुळे भाजपचा प्रचार करावा, तसेच रक्षा खडसे माझी सून आहे. या दोन्ही भूमिकेतून मी भाजपचा प्रचार करत आहे. निवडणूक भाजप लढवत आहे. मी जोडीला मदत करत आहे. खानदेशात पूर्वी सारखे वातावरण राहिलेले नाही. मात्र एवढे वाईट वातावरण ही नाही. केंद्राच्या तुलनेत राज्य सरकारच्या कामगिरीविषयी लोकांची नाराजी आहे. शेतकर्‍यांची नाराजी आहे.
Exit mobile version