आयसीसीचा ‘प्लेअर ऑफ मंथ’ पुरस्कार

इंग्लंड-श्रीलंकेचे खेळाडू भारतीयांवर वरचढ

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून दर महिन्यातील सर्वोत्तम महिला आणि पुरुष खेळाडूला पुरस्कार देण्यात येतो. त्यानुसार आता जुलै महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूंचीही घोषणा करण्यात आली आहे. या महिन्यात सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून इंग्लंडच्या गस ऍटकिन्सन या खेळाडूला निवडण्यात आले आहे, तर सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून श्रीलंकेची कर्णधार चमारी अट्टापट्टूला निवडले आहे.

आयसीसीने जुलैमधील सर्वोत्तम पुरुष खेळाडूसाठी भारताच्या वॉशिंग्टन सुंदरसह इंग्लंडच्या गस ऍटकिन्सन आणि स्कॉटलंडच्या चार्ली कॅसल यांना नामांकन दिले होते. तसेच, सर्वोत्तम महिला खेळाडूसाठी भारताच्या शफाली वर्मा आणि स्मृती मानधनासह श्रीलंकेच्या चमारी अट्टापट्टू हिला नामांकन देण्यात आले होते. यानंतर यातून गस ऍटकिन्स आणि चमारी अट्टापट्टू यांची विजेता म्हणून निवड झाली आहे. हे पुरस्कार देताना या खेळाडूंनी जुलै महिन्यात केलेल्या कामगिरीचा विचार केला गेला आहे.

पुरुष खेळाडूंची कामगिरी
जुलै महिन्यात सुंदरने झिम्बाब्वे आणि श्रीलंका दौर्‍यात टी-20 सामन्यांची मालिका खेळली. त्याने 8 पैकी 6 टी-20 सामने खेळताना 10 बळी घेतले. तसेच, खालच्या फळीत चांगली फलंदाजी केली. तो झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतील मालिकावीरही ठरला होता. गस ऍटकिन्सनने जुलैमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध तीन कसोटी सामने खेळताना 22 बळी घेतले. तर, चार्लीने जुलै महिन्यात कारकिर्दीतील पहिल्याच एकदिवसीय सामन्यात ओमान विरुद्ध 21 धावांत 7 बळी घेतले.
महिला खेळाडूंची कामगिरी
स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी जुलै महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका आणि आशिया चषक खेळला. तसेच, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकमेव कसोटी खेळली. मानधनाने यात टी-20 मालिका आणि आशिया चषक या स्पर्धांमध्ये मिळून 3 अर्धशतकांसह 273 धावा केल्या. तसेच, कसोटीत 149 धावांची खेळी केली. शफलीने कसोटीत 229 धावांची खेळी केली, तर टी-20 मध्ये 245 धावा केल्या. चमारी अट्टापट्टूच्या नेतृत्वात जुलैमध्ये श्रीलंकेने आशिया चषक जिंकला. तिने या स्पर्धेत 5 डावात 304 धावा केल्या. ती या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूही ठरली.
Exit mobile version