आयसीसी तिजोरीची दार उघडणार

टी-20 वर्ल्ड कप विजेत्या संघावर पैशाचा पाऊस पडणार

| न्यूयॉर्क | वृत्तसंस्था |

टी-20 वर्ल्ड कप सुरु झाल्यानंतर आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. टी-20 वर्ल्ड कप जिंकणार्‍या संघांना किती रक्कम मिळणार याची घोषणा आयसीसीने केली आहे. टी-20 वर्ल्ड कप विजेत्या संघाला 20.36 कोटी रुपये मिळणार आहेत. तर, उपविजेत्या संघाला 10.64 कोटी रुपयांची रक्कम मिळणार आहे. आयसीसी बक्षीसापोटी एकूण 93.52 कोटी रुपयांची रक्कम खर्च करणार आहे. आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या फेरीत 40 मॅचेस होणार आहेत. त्यानंतर सुपर 8 च्या मॅचेस होतील. पुढच्या टप्प्यात सेमी फायनल होईल आणि त्यानंतर अंतिम फेरीची लढत बारबाडोसमध्ये होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाने 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवले होते. भारतीय संघाला 2007 नंतर पुन्हा विजेतेपद मिळवता आलेले नाही. यावेळी टी-20 वर्ल्ड कपमध्ये 20 संघ सहभागी झाले आहेत. पाच संघांचा एक गट या प्रमाणे चार गटांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. भारत अ गटामध्ये असून भारताशिवाय पाकिस्तान, अमेरिका, कॅनडा आणि आयरलँड संघाचा समावेश आहे. न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जूनला लढत होणार आहे. या हाय व्होल्टेज लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारताची यानंतरची लढत 12 जूनला अमेरिकेसोबत असेल. यानंतर 15 जूनला भारत आणि कॅनडा यांच्यात लढत होणार आहे. भारत आयसीसी स्पर्धांच्या विजेतेपदाचा दुष्काळ संपवणार? भारताने 2013 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजेतेपद मिळवले होते. यानंतर गेल्या 10 वर्षांमध्ये भारताला आयसीसी स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवता आलेले नाही. 2023 च्या आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय संघ यावेळी टी-20 वर्ल्ड कप जिंकणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात बांगलादेशला 60 धावांनी पराभूत केले होते. आता भारतीय क्रिकेट संघ टी-20 वर्ल्ड कपमध्ये कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतीय संघाने स्वत: च्या क्षमतेवर विश्‍वास ठेवल्यास वर्ल्ड कपमध्ये त्यांना यश मिळेल.

Exit mobile version