जिल्ह्यात आयकॉनिक सप्ताहास प्रारंभ

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शासनाच्या महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे शुद्ध व शास्वत पेयजल उपलब्ध व्हावे यासाठी व ग्रामीण जनतेत स्वच्छतेची चळवळ गतिमान होण्यासाठी रायगड जिल्ह्यात दि. 7 ते 14 फेब्रुवारीपर्यंत आयकॉनिक सप्ताह राबविण्यात येत आहे. याबाबतचे निर्देश महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने दिले आहेत.

या विशेष सप्ताहामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत 100 टक्के नळ जोडणी झालेल्या गावामध्ये हर घर जल घोषित ग्रामसभेचा ठराव प्रमाणपत्र व व्हिडीओ क्लीप संकेत स्थळावर नोंदविणे, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व स्वच्छ पर्यावरण, तसेच सुदृढ आरोग्य आणि शुद्ध पिण्याचे पाणी या विषयावर ऑनलाईन निबंध स्पर्धा घेणे, ग्रे वाटर व्यवस्थापनाबाबत गावामध्ये भिंती चित्र रेखाटन करणे, स्वच्छ पाणी व स्वच्छता या विषयावर ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीची बैठक घेणे, सार्वजनिक स्तरावरील स्वच्छता ही श्रमदानाच्या माध्यमातून करणे, जल जीवन मिशन तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या कामाच्या नोंदी संकेतस्थळावर अध्ययावत करणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. सप्ताहात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावयाचे आहे. या सर्व उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन रायगड जिल्हा परिषदच्या अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) डॉ. ज्ञानदा फणसे यांनी केले आहे.

Exit mobile version