मूर्तीकारांची लगीनघाई सुरू

52 गणेशमूर्ती कारखान्यात 11 हजार मूर्तींची निर्मिती ; शाडूची माती व रंग महागल्याने किमतीत 20 टक्क्यांनी वाढ

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

दीड महिन्यांवर गणेशोत्सव आल्याने कारखान्यांमध्ये मूर्तीकरांची लगीनघाई सुरू आहे. मुरुड तालुक्यात 55 गणेशमूर्ती कारखाने असून, अंदाजे दहा हजार मूर्ती आकार घेत आहेत. मूर्तीचे मातीकाम वेगाने सुरु आहे. सतत पडणाऱ्या पावसाने मूर्ती बनवण्यासाठी बाहेरील मोकळी जागा वापरता येत नाही, तर वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने घरातही काम करता येत नाही, मुख्य अडचण कारखानदारांची आहे. तसेच नवीन मूर्ती कामगार नवीन तयार होत नसल्याने काम मंद गतीने होत असल्याची खंत कारखानदार श्रीकांत सुर्वे यांनी बोलून दाखवली.

मुरुड शहरात 13, एकदरा 2, खरआंबोलीत 2, तेलवडे 1, शिग्रे 3, वनणदे 3, राजपुरी 3, आगरदांडा, सावली नांदले, खामदे, उसंडी, माजगाव, तल्लेखर येथे प्रत्येकी एक कारखाना आहे. यावर्षीदेखील शाडूची माती महागल्याने मूर्तीची किंमत वाढणार आहे. गणेशमूर्ती कारखाने पावसाळ्यात सुरु होतात आणि पावसाळ्यात विजेची दुरुस्तीची कामे सतत चालू आल्याने सर्व कारखानदारांना खूप त्रास सहन करावा लागतो, तीच कामे महावितरणनने एप्रिल महिन्यात करावी, अशी मागणी कारखानदारांकडून करण्यात येत आहे.

मुरुड तालुक्यातील सर्वच कारखान्यात शाडूच्या मूर्ती बनविण्यात येतात. अपवाद काही कारखानदार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तयार मूर्ती ग्राहकांच्या मागणीनुसार आणतात. मुरुड शहराला मूर्तिकारांची परंपरा आहे. ज्येष्ठ मूर्तिकार वसंत जंजीरकर मुरुडमध्ये जन्माला आले आणि मुरुडचे नाव इतिहासात लिहून गेले. अशी परंपरा असलेले गणेश मूर्तिकार पैशाकडे न पाहता कलेचा वारसा पुढे चालवत आहेत.

शासनाने शाळांमध्ये गणेशमूर्ती कामाचे प्रशिक्षण वर्ग सुरु केल्यास मुरुडच्या कारखानदार युनियनचे सदस्य प्रत्यक्ष शाळेवर जाऊन मोफत प्रशिक्षण देण्यास तयार आहे. जेणे करून नवीन मूर्तीकार तयार होतील. मुंबईत गणेश मूर्तिकारखानदाराना पालिका मूर्ती बनवण्यासाठी जागा उपलब्ध करून देते. मुरुड नगरपालिकेने तशी जागा दिल्यास कारखान्याचा विस्तार करण्यास सोपा होईल.

श्रीकांत सुर्वे, कारखानदार

माझ्या घरी एक दिवस आधी गणेशमूर्ती आणण्याची प्रथा आहे. पाच पिढ्या आमच्याकडे शाडू मातीची मूर्ती आणली जाते. मूर्तींचे वाढते भाव श्रद्धेसमोर टिकत नाही. मुरुडच्या गणेश मूर्ती रायगडात प्रसिद्ध आहेत.

सुरेश सदरे
Exit mobile version