विद्यार्थ्यांना कला सादर करण्याची संधी
| माणगाव | सलीम शेख |
माणगाव येथील सुधाकर नारायण शिपुरकर आणि गणेश यशवंत वाघरे या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवानिमित्त आपल्या चिमुकल्या हातांनी वैविध्यपूर्ण कला सादर केली. त्यांनी बुद्धी आणि कलेची देवता श्री गणेश मुर्ती घडवून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी विविध प्रकारच्या गणेश मूर्ती तयार करताना हे चिमुकले रंगून गेले होते. त्यांनी अतिशय सुंदर आणि आकर्षक छोट्या व मध्यम आकाराच्या गणेश मूर्ती करून आपली शिल्प कला सादर केली.
गणेशोत्सव अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला असून उत्सवापूर्वी अनेक शाळांमध्ये त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी माणगावातील सुधाकर नारायण शिपुरकर आणि गणेश यशवंत वाघरे या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी गणेश मूर्ती बनवण्यात मग्न झाले होते. कोणत्याही प्रकारचा अनुभव नसतानाही ते बप्पाची मूर्ती बनविण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत गणेश मूर्ती बनवण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांना चिमुकल्या हातांनी एकेक गणपतीचा अवयव तयार करताना प्रत्येकाच्या निर्विकार चेहऱ्यावर जिद्द आणि चिकाटी दिसत होती. काही विद्यार्थ्यांचे चेहरे आणि कपडे रंगून गेले होते. विद्यार्थ्यांनी कलेच्या देवतेचे विविध हावभाव टिपण्याचा प्रयत्न केला. त्यात बरेचसे यशस्वी झाले. त्यांना ही कलाकृती करताना वेगळाच आनंद मिळत होता. यावेळी काही विद्यार्थ्यांनी शाडू, क्ले आणि शेतातील माती पासून तर काहींनी टाकाऊ कागदाच्या लगद्यापासून गणेश मुर्ती साकारल्या. प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करत मनातील बाप्पाचे लोभस आणि गोंडस रूप प्रकट करुन सादर केले. दरम्यान, गणेश मूर्ती बनविण्याची कला सादर करण्यासाठी संधी प्राप्त करून दिल्याबद्दल विद्यार्थ्यांसह पालकांनी विशेष आभार मानले. तसेच, ही शाळा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देऊन प्रेरीत करते. त्यामुळे विद्यार्थी सर्व गुण संपन्न होईल, असा आत्मविश्वास पालकांनी व्यक्त केला.






