कच्च्या मालाचे दर वाढल्याने यंदा मूर्ती महागल्या
| रायगड | प्रतिनिधी |
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाजारात गणेशमूर्तींचे स्टॉल लागले असून, गणेशमूर्ती बनविणाऱ्या कारखान्यात कारागीर मूर्तीवर अखेरचा हात फिरविताना दिसत आहेत. यात महिला कारागिरांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. यंदा गणेशोत्सवात किमती वाढल्याने अनेकांकडून छोट्या मूर्तींना पसंती दिली जात आहे.
अनेकांनी आतापासूनच मूर्तीची आगाऊ नोंदणीस सुरवात केली आहे. मूर्तीच्या दरांत वाढ झाल्याने भक्तांवर आर्थिक भार पडणार आहे. भक्तांना आतापासूनच बाप्पांच्या आगमनाचे वेध लागले आहेत. कच्च्या मालाचे भाव वाढल्याने श्रींच्या मूर्तीच्या किमतीत वाढ झाली आहे. कच्च्या मालाचा तुटवडा व कारागिरांची टंचाई अशा दिव्यातून हा व्यवसाय मार्गक्रमण करीत आहे. त्यामुळे महिला कारागीर व्यवसायाकडे वळल्या आहेत.
गणपती बनवण्यासाठी लागणाऱ्या किमती वाढल्याने छोट्या मूर्तींना पसंती आहे. कच्च्या मालात सातत्याने भाववाढ होत असल्याने यंदा श्रींच्या मूर्तीच्या किमतीत वाढ होणार आहे. प्रामुख्याने मूर्तीसाठी प्लास्टर व शाडूचा वापर करण्यात येतो. बाजारात शाडू माती नसल्याने अनेक मूर्तिकारांना ती चढ्या भावाने विकत घ्यावी लागली होती. गणपती तयार करण्यासाठी लिक्विड रबर साच्यांचा उपयोग केला जातो. या मोल्डसाठी लागणारे लिक्विड रबर महाग झाले असून, प्लास्टरचा भावही वाढला आहे. रंगकामापूर्वी वापरला जाणारे इमल्शन महाग झाले आहे.
रंग महागला
एअर कॉम्प्रेसरची गन व रंग महाग झाले आहेत. तसेच ब्रशच्या किमतीतही वाढ झाली असून, गोल्डन पावडर महाग झाली आहे. त्यामुळे किमतीत वाढ होत आहे. महागाईबरोबरच कारागिरांची कमतरता हे एक संकट मूर्तिकारांसमोर आहे. अनेक कारागिरांनी स्वतःचे कारखाने सुरू केले आहेत. लंबोदर, लालबाग, मोदकेश्वर जटाधारी कृष्णावतार, दगडूशेठ, कसबा गणेश, सारसबाग, स्वामी समर्थ अवतार, ब्राह्मण बैठक, पद्मासन, पेशवा गणपती आदी मूर्ती विक्रीस आल्या आहेत.







