‘नोटा’ला बहुमत मिळाल्यास फेरनिवडणूक घ्या

सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला नोटीस

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्याचे मतदान शुक्रवारी देशभरात पार पडले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीतील ‘नोटा’ या पर्यायावरील याचिकेवर महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. नोटापेक्षा कमी मते मिळणार्‍या उमेदवारावर सर्व निवडणुकात पाच वर्षांसाठी बंदी घालावी, तसेच नोटाला बहुमत मिळाल्यास फेरनिवडणूक घ्यावी, यासंबंधित नियम करण्याचे आयोगाला निर्देश देणार्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहेत.
नोटापेक्षा कमी मते मिळविणार्‍या उमेदवारांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी सर्व निवडणुका लढवण्यापासून रोखले जाईल, काल्पनिक उमेदवार म्हणून नोटाचा योग्य आणि कार्यक्षम अहवाल प्रसिद्धी सुनिश्‍चित करण्यासाठी नियम तयार करावेत, नोटाला बहुमत मिळाल्यास, विशिष्ट मतदारसंघात झालेली निवडणूक रद्दबातल घोषित केली जाईल. तसेच संबंधित मतदारसंघात नवीन निवडणूक घेतली जाईल, असे नियम तयार करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी याचिकेत याचिकाकर्त्याने केली आहे. या याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे.

Exit mobile version