शेतचं कुंपणाने खाल्ले… तर दाद कोणाकडे मागायची


| पेण | प्रतिनिधी |

आमटेम निगडे खाडीमध्ये खाकीच्या आशीर्वादाने अवैध वाळू उत्खनन सुरु असल्याची बातमी कृषीवलमध्ये प्रसिध्द झाली आणि महसूल खात्याच्या अधिकार्‍यांना जाग आली. महसूलचे अधिकारी तातडीने आमटेम निगडे खाडीच्या पुलाखाली पोहचले. प्रसिध्द झालेली बातमी खरी असल्याने खाडी किनारी दहा ते बारा ब्रास वाळू सक्शनद्वारे काढलेली प्रथमदर्शनी दिसली परंतु, वाळू माफीयांनी अधिकार्‍यांवर अशी काही जादू केली की, अधिकारी वर्गाने फक्त एक ब्रास वाळू जप्त करुन पेण प्रांत कार्यालयाच्या आवारात आणली. मात्र, उरलेली वाळू व दगडमिश्रीत वाळू कोठे गायब झाली अथवा वाळू माफीयांनी अशी कोणती जादू केली की, नऊ ते अकरा ब्रास वाळू अधिकार्‍यांनी दाखवली नाही, याचा अर्थ महसूलचे कनिष्ठ कर्मचारी वरिष्ठांची दिशाभूल करत आहेत. एवढे निश्‍चित झाले आहे. सरकारी नियमानुसार जप्त केलेल्या वाळूला पाचपट दंड आकारला जातो. मात्र, जप्त केलेल्या वाळूचा मालक कोण? याबाबतच अधिकार्‍यांनी माहिती न दिल्याने वाळू माफीयांना अधिकारी वर्ग तर पाठीशी घालत नाही ना? असा ही प्रश्‍न उपस्थित होत आहे. या प्रकरणाबाबत पेण तहसिलदार सखोल चौकशी करीत आहेत.

खाकीवाले आणि महसूलचे अधिकारी यांचा वाळू माफीयांशी निकटचा संबंध असल्याची चर्चा न लपणारी आहे. वाळू जप्त करायला गेलेल्या अधिकार्‍यांनी प्रथम जेवणावर आडवा हात मारला. नंतर आंब्यांचा आस्वाद घेतला आणि एक ब्रास वाळू घेऊन पेणला आले.
Exit mobile version