‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ पनवेल मनपाचे अभियान


| पनवेल | वार्ताहर |

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान राबविण्यात येणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 18 वर्षावरील महिला ,माता, गरोदर स्त्रीया यांची सर्वांगीण तपासणी पालिका क्षेत्रातील सर्व सहा नागरी प्राथमिक आरेाग्य केंद्रांवरती करण्यात येणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व महिलांनी या अभियानात सहभाग घ्यावा असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले. पनवेलच्या आरोग्य केंद्र 1 वर अभियानाला सोमवारी सुरुवात करण्यात आली.

या अभियानांतर्गत 18 वर्षावरील सर्व महिला, माता, गरोदर स्त्रीया यांची आरोग्य तपासणी , प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अभियानासाठी एम.जी.एमचे स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ तसेच पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील प्रसिध्द स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ आपली सेवा देणार आहेत. या अभियानांतर्गत गर्भधारणापूर्व काळजी आणि मानसिक आरोग्य, स्तनपान, व्यसनमुक्ती, पेाषण या विषयांवरती समुपदेशन कार्यक्रमही राबविण्यात येणार आहे. यासाठी नवविवाहित महिलांनी या अभियानांतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

याबरोबरच या अभियानांमध्ये सोनोग्राफी शिबिरही घेण्यात येत आहे. यामध्ये चेस्ट एक्सरे, आवश्यकतेनुसार मॅमोग्राफी करण्यात येणार आहे. तसेच महिला व मातांचे हिमोग्लोबीन, रक्त-लघवी यांच्या तपासण्या मोफत करण्यात येणार आहे. माता-बालकांचे लसीकरणही करण्यात येणार आहे. 30 वर्षावरील स्त्रीयांचे कर्करोग, रक्तदाब, मधुमेह स्क्रींनिंग करण्यात येणार आले. ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानात महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेऊन आपली तपासणी करावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version