पालिका करणार नसेल, तर आम्ही रस्ता करतो- घावरे

। नेरळ । प्रतिनिधी ।

माथेरान शहरातील हुतात्मा विर भाई कोतवाल शॉपिंग सेंटरमधील खराब झालेला रस्ता तयार करावा म्हणून मागील काही महिने अनेकांनी निवेदने दिली आहेत. पालिका त्या रस्त्याचे दुरुस्तीचे काम करणार नसेल तर आम्हाला त्या बाबत माहिती द्यावी. पालिका प्रशासन सुस्त झाले असेल तर आम्ही त्या रस्त्यावरील खड्डे भरून घेवू, असे आवाहन माजी नगरसेवक प्रदीप घावरे यांनी माथेरान नगरपरिषदेला केले आहे.

माथेरान शहरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची मोठी गर्दी हुतात्मा भाई कोतवाल शॉपिंग सेंटर येथे असते. त्या भागात पर्यटन हंगामात आणि प्रामुख्याने पावसाळ्यात या भागात असलेले खड्डे हे स्थानिक व्यावसायिक यांच्यासाठी डोकेदुखी बनले आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी स्थानिक व्यावसायिक गेली अनेक महिने सातत्याने करत आहेत. मात्र, प्रशासकाच्या हाती कारभार असलेल्या माथेरान नगरपरिषदेमध्ये पर्यटकांच्या सोयीसाठी देखील रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही. पर्यटकांकडून पालिका प्रशासन स्वच्छता आणि प्रवासी कर संकलित करते. मग पालिकेने शहरात पर्यटकांची सुविधा लक्षात घेऊन कामे केली पाहिजेत.
मात्र शहरातील महत्वाचा असा हा रस्ता आजही दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे. रस्त्याच्या दुतर्फा गटारे आहेत. पण पाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक निघून गेले आहेत. पालिका प्रशासन त्या खराब रस्त्याच्या दुरुस्ती साठी कोणत्याही हालचाली करत नाही. हे लक्षात घेऊन स्थानिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक प्रदीप घावरे आक्रमक झाले आहेत. त्यांनी पालिकेला आवाहन केले असून हुतात्मा वीर भाई कोतवाल शॉपिंग सेंटरमधील रस्त्याची दुरुस्ती करणार नसाल, तर आम्हाला त्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची परवानगी द्यावी. आम्ही आमच्या खर्चाने हुतात्मा भाई कोतवाल शॉपिंग सेंटरमधील रस्त्याची दुरुस्ती करून देऊ. दरम्यान, पालिका प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version