आवाज कमी.. डीजे तुला आईची शपथ हाय!

आवाज वाढल्यास कायदेशीर कारवाई होणार

। पेण । प्रतिनिधी ।

राज्य शासनाने यंदा गणेशोत्सवावरील निर्बंध उठविल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह संचारला आहे. अनेकांनी याचा अर्थ मोठ्या साउंड सिस्टीम्सला परवानगी दिली असाच काढला आहे. त्यामुळे मोठया सिस्टीम्सचे बुकिंगही जोरात आहे. परंतु, निर्बंध उठविले असले तरी ध्वनिप्रदूषण कायद्यातील तरतुदी शिथिल करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे आवाजाची मर्यादा ही सर्वांनाच पाळावी लागणार आहे. जर ही मर्यादा ओलांडली तर मात्र मंडळांच्या कार्यकर्त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

कोरोनाच्या दोन वर्षातील निर्बंधानंतर यंदा धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्याची तयारी तरुण मंडळांनी केली आहे. अनेक मंडळांचा जोर साउंड सिस्टीम्सवर आहे. जरी निर्बध शिथिल केले असले तरी पोलिसांची परवानगी अनिवार्य आहे. आवाजाच्या डेसिबलची मर्यादा ही पाळावीच लागणार आहे. यावर पोलिसांची करडी नजर असणार आहे.

किती आवाजाला शहरात परवानगी?
शहरात ध्वनिप्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम 2000 या कायद्यातील तरतुदीनुसार 55 डेसिबलपर्यंत आवाजाची मर्यादा घालून दिली आहे. तेवढयाच आवाजाला परवानगी आहे. त्यापेक्षा जास्त आवाज वाढवू शकत नाही. दोन टॉप, दोन बेसलासुध्दा कायद्याने परवानगी दिलेली नाही.

पोलिसांची परवानगी आहे का?
शहरात गणेशोत्सवाच्या निमित्ताने श्रींचे आगमन व विर्सजनाची मिरवणूक निघणार आहे. तीन-चार दिवस मिरवणुका निघणार आहेत. त्यासाठी गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून मिरवणूक तसेच साउंड सिस्टीम लावण्यासाठी परवानगी मागण्यास सुरूवात झाली आहे. परंतू, पोलीस प्रशासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही.

मोठ्या आवाजाचा धोका
मोठया आवाजाच्या साउंड सिस्टीममुळे विशेषत: वयोवृध्द तसेच आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, लहान मुले यांना त्रास होण्याची जास्त शक्यता असते. काहींना बहिरेपणाही येवू शकतो. हृदयरोग असणार्‍या व्यक्तींना तर मोठा धोका असतो. साउंड सिस्टीममुळे सर्वसामान्य निरोगी माणसांचा रक्तदाब वाढू शकतो. हृदयाचे ठोके वाढू शकतात. हृदयविकाराचा झटका येउ शकतो. त्यामुळे आवाजावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

विशेषत: हृदयविकार असलेल्या लोकांचा रक्तदाब वाढतो. छाती धडधडायला लागते. त्यामुळे साउंड सिस्टीमपासून दूर राहणे चांगले होईल.

डॉ.मनिष वनगे, हृदयरोग तज्ञ

मिरवणुकीत सर्वच मंडळांना ध्वनिप्रदूषण कायद्याचे पालन करावे लागणार आहे. आवाजाची मर्यादा सर्वांनाच पाळावी लागणार आहे. जर कायद्याचे उल्लंघन झाले तर मात्र कारवाई करावी लागेल. म्हणून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कटू प्रसंग टाळून उत्सव साजरा करावा.

देवेंद्र पोळ, पोलीस निरीक्षक, पेण
Exit mobile version