परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय; प्रवाशांना दिलासा
| रत्नागिरी | प्रतिनिधी |
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये बिघाड झाल्यास अथवा अपघात झाल्यास प्रवाशांना त्याच तिकिटावर अन्य कोणत्याही एसटी बसमधून (साधी, निमआराम, वातानुकूलित, शिवशाही, ई-शिवाई किंवा शिवनेरी) विनाशुल्क व तातडीने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. या प्रवाशांकडून फरकाच्या पैशासाठी अडवणूक केल्यास अथवा प्रवाशांचा प्रवेश नाकारल्यास संबंधित वाहक-चालकांवर कठोर कारवाई करण्याची सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात एसटी महामंडळाच्या बसमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. एसटी ही खेडोपाडी पोहोचण्याचे साधन असल्यामुळे नागरिकांकडून एसटीच्या प्रवासाला प्राधान्य दिले जाते. अशातच लांब किंवा ग्रामीण मार्गावर प्रवास करत असताना बस अचानक बंद पडली तर प्रवाशांना ताटकळत तासन् तास बसावे लागते. अनेकवेळा निर्मनुष्य, आडवळणावर एसटी बंद पडते. अशावेळी महिला, वयोवृद्ध, मुले एकूणच प्रवाशांचे हाल होतात. पर्यायी बसा उपलब्ध होत नाही, शिवाय अनेक बसेसा जागा नाही सांगून प्रवाशांना बसमध्ये घेण्याचे टाळतात. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता परिवहन मंत्री सरनाईक यांचा निर्णय प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
अन्यथा तक्रार नोंदवावी
एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून याबाबत सुधारित आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांकडून अधिकचा आकार आकारू नये. त्याच तिकिटावर उच्च श्रेणीच्या बसमध्ये देखील प्रवाशांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. ग्राहक संरक्षणाच्या दृष्टीने हा प्रवाशांचा कायदेशीर हक्क मानला जात असून, त्याची अंमलबजावणी काटेकोर व्हावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तरीदेखील एशियाड, हिरकणी, शिवनेरी, शिवशाही किंवा ई-शिवाई बसमध्ये नियम असूनही प्रवेश नाकारला गेला, तर प्रवाशांनी आगारप्रमुख, वाहतूक नियंत्रक किंवा नियंत्रकांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.







