खबरदारी घेण्याचे महावितरणचे आवाहन
| कल्याण | वार्ताहर |
दिवसा पथदिवे सुरू असल्याचे आढळल्यास संबंधित ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांची वीजजोडणी खंडित करण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार कल्याण परिमंडलातील अधिकारी व कर्मचार्यांना सतर्क राहून कारवाई करण्याचे आदेश मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी नुकतेच दिले आहेत. तर पथदिवे दिवसा सुरू राहणार नाहीत, यासाठी आवश्यक यंत्रणा उभारून खबरदारी बाळगण्याचे आवाहनही त्यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाला केले आहे.
ठराविक वेळेत पथदिवे चालू-बंद करण्याची स्वंयचलित यंत्रणा किंवा या कामासाठी आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था नसल्यास ग्रामपंचायतींचे पथदिवे दिवसाही सुरु राहतात. ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांच्या संचालन व वीजबिलाची जबाबदारी ग्रामपंचायतींकडे असते. महावितरणकडून स्वतंत्र वीजवाहिनीद्वारे पथदिव्यांसाठी जोडणी देण्यात येते. दिवसा दिवे सुरू राहिल्याने विनाकारण विजेचा अपव्यय व पर्यायाने संबंधित ग्रामपंचायतीचेही नुकसान होते. ते टाळण्यासाठी ग्रामपंचायतींनी पथदिवे ठराविक वेळेत चालू-बंद करण्याची स्वंयचलित यंत्रणा बसवावी किंवा मनुष्यबळाची व्यवस्था करावी. यापुढे दिवसा पथदिवे सुरू आढळणार्या ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांची वीजजोडणी खंडित करण्यात येणार आहे. तशा स्पष्ट सूचना क्षेत्रीय अभियंते व कर्मचार्यांना देण्यात आल्या आहेत.
कल्याण परिमंडलात ग्रामपंचायत पथदिव्यांच्या वीजजोडण्यांची (कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित ग्राहक वगळून) संख्या जवळपास 1553 आहे. पथदिव्यांच्या जाडण्यांचे एप्रिल 2022 महिन्याच्या चालू बिलातील 1 कोटी 16 लाख तर मे 2022 महिन्याच्या चालू बिलातील 2 कोटी 54 लाख रुपये थकीत आहेत. तर एप्रिल 2021 ते मार्च 2022 दरम्यानचे 21 कोटी 3 लाख रुपयांचे चालू वीजबिल थकबाकीत आहे. चालू वीजबिल भरून पथदिव्यांचा वीजपुरवठा अखंडित ठेवण्याचे आवाहनही महावितरणने केले आहे.